लासलगाव : आरोग्य विभागाचा गलथान कारभार, व्हेंटिलेटर पिंपळगाव बसवंतला ‘वर्ग’

लासलगाव वार्ताहर – निफाड तालुक्यात कोरोना विषाणूचा संक्रमण मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने एकूण रुग्ण संख्या दोन हजाराच्या जवळपास गेली आहे तर कोरोनामुळे आतापर्यंत 59 जणांचा बळी गेल्याने निफाड तालुक्यासाठी राज्य शासनाकडून आलेले चार व्हेंटिलेटर हे तांत्रिक कारण देत लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर सेंटर येथून पिंपळगाव बसवंत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिल्याने भाजपाकडून आश्चर्य व्यक्त करत चार दिवसात पुन्हा कार्यान्वित न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जि प सद्स्य डि के जगताप, जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश दायमा यांनी दिला आला आहे

निफाड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असतात मात्र आरोग्य विभागाचा गलथान कारभारामुळे लासलगाव कोविड सेंटरला मिळालेली व्हेंटिलेटर हे एमडी वैद्यकीय अधिकारी नसल्याचे कारण देत सदरचे व्हेंटिलेटर हे पिंपळगाव बसवंत येथे पाठविण्यात आल्याचा प्रकार लासलगाव मध्ये घडला आहे.

भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरू असून नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांना कोरोनाची बाधा होत असल्याने निफाड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे एकूण कोरोना बधितांची संख्या 1962 वर पोहचली आहे तर आतापर्यंत कोरोनावर उपचार घेत असतांना 59 जनांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे एकीकडे शहरी भागात बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागात कोणाचे जीव जाऊ नये यासाठी आरोग्य विभागाकडून लासलगाव कोविड केसर सेंटर येथे दीड महिन्यापूर्वी 16 लाख रुपये किमतीचे चार व्हेंटिलेटर देण्यात आले होते संबंधित कंपनीकडून या चारही व्हेंटिलेटर चा वापरण्या संदर्भात लासलगाव येथील आरोग्य टीमला डेमो देण्यात आला होता

मात्र हे व्हेंटिलेटर कार्यन्वित न करता, मेस्मा कायदा राज्यात लागू असतानाही लासलगाव येथे तीन एमडी मेडिसिन डॉक्टर असून सुध्दा डॉक्टर उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करत हे व्हेंटिलेटर परत केले असल्याची बाब ही लासलगाव भारतीय जनता पार्टीने दिलेल्या निवेदनातून समोर आली आहे यामुळे लासलगाव व परिसरातील नागरिकांनासह भाजपाच्या वतीने संताप व्यक्त करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे तसेच तातडीने हे चार ही व्हेंटिलेटर आणि डॉक्टरांची टीम उपलब्ध करून देण्याची मागणी लासलगाव जिल्हापरिषद गटाचे सदस्य ज्ञानेश्वर जगताप आणि नाशिक भाजपाचेे जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश दायमा यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष योगेश पाटील, राजेंद्र चाफेकर,रवी होळकर,बापू लचके,मनोज भावसार,संतोष पवार यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे चार दिवसात व्हेंटिलेटर कार्यान्वित न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.