Lasalgaon News : नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील भरवस फाटा येथे धाडसी चोरी, दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकजण ठार तर दुसरा जखमी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक -औरंगाबाद राज्यमार्गावरील निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे घरफोडी दरम्यान एक वृद्ध ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत कारभारी आबाजी जगताप यांचा मृत्यू झाला.

लासलगाव पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार भरवस फाटा येथे नाशिक औरंगाबाद रस्त्यालगत कारभारी आबाजी जगताप (वय ६९) व अलका कारभारी जगताप हे दाम्पत्य राहत असून त्यांची मुले वस्तीवर वेगवेगळ्या ठिकाणी राहतात सकाळी उठायला गेले असता कारभारी जगताप मृतावस्थेत तर त्यांची पत्नी अलका गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्याने या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होत जखमी महिलेला पुढील उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गंभीर जखमी अलका यांच्या जबाबानंतर सदर घटनेचा उलगडा होणार जरी असला मात्र परिस्थिती नुसार पोलीस घरफोडी की खून या दिशेने तपास करीत आहे.

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक रंगनाथ सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांसह पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.