टाकवे खुर्द गावात बिबट्याने केली घोडीची शिकार

कामशेत  : पोलीसनामा ऑनलाइन  – कामशेत जवळील टाकवे खुर्द गावातील शाळेच्या मागच्या बाजुला असलेल्या घोडीवर रात्री हल्ला करून बिबट्याने तिची शिकार केली. काही दिवसांपूर्वी या परिसरातच एक बिबट्या शिकाऱ्यांनी टाकलेल्या फासात अडकून गतप्राण झाला होता.

टाकवे गावाच्या उत्तरेकडे मोठा डोंगर असून या परिसरात घनदाट जंगल आहे. या भागात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जंगलामध्ये पाण्याची वानवा आहे. या भागातून पाण्याच्या शोधात बिबटे गावात आल्याचा अंदाज स्थानिक गावकरी व्यक्त करत आहे. शेतकरी उशिरापर्यंत शेतात काम करत असतात. त्यातच बिबट्या आढळल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच एका घोडीवर बिबट्याने हल्ला केला आहे. वन विभागाने कोणताही अनुचित प्रकार घडण्याअगोदार सर्च करून व पिंजरा लावुन बिबट्यांना पकडावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासुन याठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिसराची पाहणी करून वन विभागाकडून दोन टीमची नियुक्ती केली गेली होती. परंतु पुढे या टीमला काहीच हातात लागले नाही व आज एका घोडीचा दुदैर्वी मृत्यू झाला. याबाबत बोलताना शिरोताचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मारणे म्हणाले, प्राथमिक माहितीत हा हल्ला बिबट्यानेच केला असावा असा अंदाज आहे. घोडीला शवविच्छेदन करण्यास न पाठवता त्या ठिकाणी एक कॅमेरा लावून पुन्हा खाण्यास बिबट्या येतो का ते पाहत असुन नागरिकांनी सतर्क राहावे व रात्री फिरणे टाळावे असे आवाहन केले आहे.