Video : व्हिडीओ शेअर करत देवेंद्र फडणवीसांनी विचारला प्रश्न, म्हणाले – ’15 फेब्रुवारीला अनिल देशमुख क्वारंटाईन होते, मग हे नेमके कोण?’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर पत्र लिहित अनेक गंभीर आरोप केलेत. 100 कोटींच्या वसुलीबाबतचा दावाही त्यांनी केला होता. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य करत मोठा खुलासा केला आणि सिंग यांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख कोरोना (COVID-19) मुळं नागपुरात त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाईन होते. त्यामुळं त्यांना भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं पवार म्हणाले होते. यानंतर आता भाजप नेत्यांनी अनिल देशमुख यांचं एक जुनं ट्विट नव्यानं शेअर केलं आहे आणि शरद पवार खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही देशमुख यांचं हे ट्विट शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात 5 ते 15 तारखेपर्यंत कोरोनामुळं रुग्णालयात दाखल होते. 15 फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते 15 ते 27 फेब्रुवारी दरम्यान नागपुरात राहत्या घरी क्वारंटाईन होते. त्यामुळं ते कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती हे सिद्ध झालं आहे असं शरद पवारांनी सांगितलं. यावर भाजप नेत्यांनी सवाल केला आहे की, 15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद कशी काय घेतली. यासंदर्भ भाजपनं ट्विट केलं आहे.

‘मग हे नेमके कोण आहेत ?’

देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांचं 15 फेब्रुवारीचं ट्विट रिट्विट केलं आहे. त्यांनी लिहिलं की, 15 ते 27 फेब्रुवारी अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते असं शरद पवार सांगतात. परंतु 15 ला ते सुरक्षारक्षकांसह पत्रकार परिषद घेताना दिसत आहेत. त्यांच्या समोर माध्यमांचे बूम, माईक आहेत तर पाठीमागे सुरक्षा रक्षक आहेत. हे नेमके कोण आहेत असा सवालही फडणवीसांनी केला आहे.

भाजप नेते अमित मालविया यांनीही अनिल देशमुख यांचे 15 फेब्रुवारीचं ट्विट शेअर केलं आहे. तुमचं खोटं उघडं पडलं आहे असंही मालविया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले होते शरद पवार ?

शरद पवार म्हणाले, अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात 5 ते 15 तारखेपर्यंत कोरोनामुळं रुग्णालयात दाखल होते. 15 फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते 15 ते 27 फेब्रुवारी दरम्यान नागपुरात राहत्या घरी क्वारंटाईन होते. त्यामुळं परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात खूप फरक आहे. अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती हे सिद्ध झालं आहे असंही पवारांनी सांगितलं.

‘वाझे-देशमुख भेटीची चर्चाच खोटी’

‘वाझे-देशमुख’ यांच्या भेटीवर बोलताना शरद पवार म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात अनिल देशमुख कोरोनामुळं रुग्णालयात होते. त्यानंतर ते क्वारंटाईन होते. त्यामुळं या काळात सचिन वाझे (Sachin Vaze) आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची शक्यताच नाही. त्यामुळं परमबीर सिंग यांचे आरोप खोटे असल्याचं दिसून येत आहे असंही त्यांनी सांगितलं.