काँग्रेसची डोकेदुखी वाढली, संभाव्य उमेदवाराची निवडणुकीतून माघार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस पक्षाकडे असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील संभाव्य उमेदवाराने ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचा मुलगा विशाल मुत्तेवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. विशाल मुत्तेवार हे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार होते. काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार अजून घोषित केला नाही. आज या ठिकाणच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी विशाल मुत्तेवार यांनी नागपुरमध्ये पत्रकारांशी बोलताना, मला पक्षाने हिरवा झेंडा दाखवला असून कामाला लागण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले होते. विशाल मुत्तेवार हे नागपूरचे असून ते चंद्रपुरातून निवडणूक लढवणार असल्याचे चंद्रपूर येथील काँग्रेस कार्यर्त्यांना समजले. त्यामुळे या ठिकाणच्या कार्य़कर्त्यांनी विशाल मुत्तेवार यांच्या उमेदवारीला विरोध केला. कार्य़कर्त्यांचा विरोध पाहून आणि या ठिकाणी आपण पराभूत होऊ शकतो या भितीने विशाल मुत्तेवार यांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे.

मंगळवारी रात्री काँग्रेसने विदर्भातील चार उमेदवारांची नावे जाहीर केली होती. नागपूरमधून नाना पटोले, गडचिरोलीमधून नामदेव उसेंडी, यवतमाळमधून माणिकराव ठाकरे तर वर्ध्यामधून चारुलता टोकस यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. रामटेक आणि चंद्रपूरमध्ये कोण उमेदवार द्यायचा यावरून काँग्रेस अडचणीत सापडला आहे. रामटेक मतदारसंघासाठी राज्याचे माजी राज्यमंत्री नितीन राऊत आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक यांची नावे चर्चेत आहेत. वासनिक यांना रामटेकमधून उमेदवारी द्यायची का अमरावतीमधून यावरून काँग्रेसपुढे पेच आहे. सावनेर विधानसभा मतदारसंघ हा रामटेक लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. सावनेरचे आमदार सुनील केदार आणि मुकुल वासनिक यांचं फारसं जमत नाही. यामुळे वासनिक रामटेकमधून लढण्यास फार इच्छुक नाहीयेत.