हरणेमाळ तलावाजवळील आठ गावठी दारुभट्ट्या उध्वस्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान तालुका पोलिसांनी हरणेमाळ तलावाजवळील ८ गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त केल्या आहेत. या प्रकरणी तालुका ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गावठी दारु तयार करुन ती विक्री केली जात असल्याची माहिती तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना मिळाली होती. त्यानुसार तालुका निरीक्षकांनी एक पोलीस पथक तयार करुन तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरणेमाळ परिसरात शोध मोहिम सुरु केली. या वेळी पाहणी करताना दऱ्या, खोऱ्यात, तलावाच्या काठी असलेल्या काटेरी झाडी झुडपाजवळ भट्टी तयार करुन त्यात हातभट्टीची दारू तयार केली जात होती. पथकाने हरणेमाळ परिसरातील आठ भट्टयांवर कारवाई करत अवघ्या काही तासांतच त्या उद्वस्त केल्या. अंदाजे ८० हजार रुपये किंमतीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.