‘पठाणी’ वसुली करत सावकाराची ‘गुंडगिरी’ ! कर्ज 24 लाख अन् वसूल केले 74 लाख

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – बारामतीमध्ये 24 लाखांच्या कर्जाच्या मोबदल्यात 74 लाख रुपयांची रक्कम दिल्यानतंरही खंडणीसाठी घरात घुसून मारहाण करणाऱ्या चार सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीची मागणी केल्या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात खंडणीसह घरात घुसून मारहाण करणे, महाराष्ट्र सावकारी अधिनियम आदी कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांनी यातील प्रमुख आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर तीनजण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपी प्रताप रमेश जाधव याला अटक केली आहे. तर विक्रम रमेश जाधव, राकेश रामकिसन वाल्मिकी आणि रुपेश रामकिसन वाल्मिकी हे फरार आहेत. याप्रकरणी अनिकेत दिपक चंकेश्वरा (वय-35) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काय आहे प्रकरण ?
अनिकेत चंकेश्वरा यांचा शहरात कार डेकोर करण्याचा व्यवसाय आहे. 2015 मध्ये बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या प्रताप जाधव याने वेगवेगळ्या व्यक्तिंच्या नावाने चंकेश्वरा यांना 24 लाख 61 हजार रुपयाची रक्कम व्याजाने दिली होती. या बदल्यात चंकेश्वरा यांनी व्याजासहीत 32 लाख 83 हजार रुपये प्रताप जाधव याला परत केले होते. या व्यतिरिक्त मागील 25 महिन्यापासून ते एप्रिल 2020 अखेर पर्यंत चक्रवाढ व्याज म्हणून चंकेश्वरा यांनी जाधवला 42 लाख रुपये दिले आहेत. चंकेश्वरा यांनी आजपर्यंत 74 लाख 83 हजार रुपये परत केले होते. तसेच सुरक्षेपोटी जळोची हद्दीतील पाच गुंठ्याचा बिगर शेती प्लॉट खरेदीखत करून दिला होता. व्याजासह पैसे परत केल्यानंतर जळोची येथील प्लॉट देखील जाधव याने परत केला नाही.

परंतु जाधव याने हा व्यवहार पूर्ण केला नाही. तसेच त्याच्या फॉर्च्युनर मधून आरोपींनी चंकेश्वरा यांना शहरातील माळावरची देवे येते नेवून चाकूचा धाक दाखवत तुझा पुण्यातील आंबेगाव बुद्रूक येथील फ्लॅट माझ्या नावावर कर, तरच तुझा जळोचीचा पाच गुंठ्याचा प्लॉट व तुझ्याकडून घेतलेले नऊ कोरे चेक परत करीन अशी धमकी आरोपींनी दिली होती. तसेच आंबेगावचा फ्लॅट नावावर केला नाहीतर जीवे मारण्याची धमकी देवून कुटुंबातील व्यक्तींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

फ्लॅटच्या कर्जापोटी 30 लाख 81 हजार रुपयाची रक्कम प्रताप जाधव याने भरावी, त्यातून उरलेली 14 लाख 17 हजार रुपये रक्कम चंकेश्वरा यांना परत करण्याचे ठरले होते. चंकेश्वरा यांच्या बँक खात्यामध्ये 14 लाख 17 हजार रुपाची रक्कम जमा झाल्यावर आरोपींनी ती खंडणी म्हणून दे अशी मागणी प्रताप जाधव याने केली.