Lockdown : राज्यात लवकरच ‘लॉकडाऊन’ 3 चा निर्णय, ‘एवढे’ दिवस वाढण्याची शक्यता !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना व्हायरसने कहर माजवला असून देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन 3 मे रोजी संपत असून त्यानंतरच्या उपाय योजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. राज्यात ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे अशा जिल्ह्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या मुंबई आणि पुण्यात आहे. त्यामुळे राज्यात जर लॉकडाऊन वाढवायचे असेल तर ते मुंबई आणि पुण्यात कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील इतर जिल्हे जे रेड झोनमध्ये आहेत, त्यांचाही समावेश लॉकडाऊन 3 मध्ये असणार आहे.

लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन साधारणपणे दोन आठवड्यांचे असण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने मुंबई आणि पुणे शहरावर जास्त भर असणार आहे. त्या व्यतिरिक्त जे झोन राज्यामध्ये तयार करण्यात आले आहे. त्या भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तर, ज्या भागात हॉटस्पॉट आहेत, त्या ठिकाणी लॉकडाऊन हटवला जाऊ नये, पण ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी होत आहे तसेच हॉटस्पॉट कमी झाले तिथे 3 मे नंतर दिलासा द्यायला हवा, असे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

या राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता
देशातील अनेक राज्यांना 3 मे पर्यंत असलेल्या लॉकडाउनचा कालावधी आगामी काही दिवसांसाठी आणखी वाढवण्यात यावा असे वाटत आहे. तेलंगणा या राज्यात यापूर्वीच काही दिवस लॉकडाऊन वाढवले आहे. दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब आणि ओडिशा या राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

दिल्लित लॉकडाऊन आगामी 16 मे पर्यंत वाढवयाचे असल्याचे दिल्ली सरकारचे म्हणणे असल्याची माहिती मिळत आहे. यानंतर एक दिवसानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब आणि ओडिशा या पाच राज्यांनी 3 मे नंतर आपापल्या राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. हॉटस्पॉट असलेल्या भागात कोणतीही सवलत मिळणार नाही.

हे राज्य बैठकिनंतर निर्णय घेणार
गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, हिमाचल प्रदेश आमि कर्नाटक ही इतर सहा राज्ये केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करतील असे सांगत आहेत. दुसरीकडे आसाम, केरळ आणि बिहार यांचे म्हणणे आहे की ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकिनंतर निर्णय घेतील.