Lockdown Again : पुण्यात ‘शनिवार-रविवार’ लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा विचार : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसनं सर्वत्रच थैमान घातलं आहे. काल (बुधवार) देशात तब्बल 45 हजाराहून अधिक कोरोनाचे रूग्ण समोर आले आहेत तर राज्यात 10 हजाराहून अधिक रूग्ण समोर आले होते. पुण्यात बुधवारी दिवसभरात 1751 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनची मुदत आज (दि.23) रात्री 12 वाजता संपणार आहे. त्यामुळे पुढं काय असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी नवन किशोर राम यांनी आगामी काळात लॉकडाऊन राहणार नसल्याचे स्पष्ट केले मात्र त्यांनी आवठडयातील शनिवार आणि रविवारी लॉकडाऊन चालूच ठेवण्याचा सध्या विचार चालु असल्याचे सांगितले. एका मराठी चॅनलशी बोलताना जिल्हाधिकार्‍यांनी ही माहिती दिली आहे.

यापुर्वीं आपण 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. आता असाच लॉकडाऊन पुढे होणार नाही. पण पुढे नक्कीच आम्हाला कुठं तरी निर्बंध आणावे लागतील. लोकांचे मत जाणून घेवुनच निर्णय घेण्यात येणार आहे. आठवडयातील शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन सुरूच ठेवण्याचा विचार आहे. मात्र, त्याबाबत शासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी तसेच लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतरच त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या तरी केवळ आगामी काळात शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू आहे. अद्याप तो निर्णय झालेला नाही. मात्र, पुर्वीसारखा लॉकडाऊन नसला तरी लोकांवर निर्बंध राहणार आहेत. त्याबाबतची नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

लग्न समारंभाच्या उपस्थितीबाबत देखील विचार सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात लग्न समारंभास जास्त लोक उपस्थित राहिल्याने अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल करणे प्रत्येकवेळी योग्य नाही. त्यामुळे त्याबाबत देखील विचार चालू असून लग्न समारंभाच्या उपस्थितीबाबतची देखील नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी पुण्यात आगामी काही दिवसांसाठी शनिवार आणि रविवारी लॉकडाऊन असणार असल्याचे सूतोवाच केले आहे. अद्याप अंतिम निर्णय झाला नसला तरी शासन याबाबत विचार करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.