भाजपा नेत्या पंकजा मुंडेंचं सूचक विधान, म्हणाल्या – ‘आरोग्य यंत्रणेवरील भार गांभीर्यानं घ्यायला हवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गात तीव्र असंतोष आहे, पण लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे सरकारने म्हटले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्वाची बैठक सुरु आहे. दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडेंनीही सूचक ट्विट केले आहे. लॉकडाऊनमुळे गरिबांची, व्यापाऱ्याची आर्थिक परिस्थिती कठीण होईल. पण पर्याय काय आहे?, असा प्रश्न पंकजा यांनी विचारला आहे. कोरोनाची साखळी कशी तोडणार? मजुर आणि उद्योजकांना नोकरदारांना विश्वास देणे आवश्यक आहे. तसेच आरोग्य यंत्रणांवरील भार हा गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान कोरोना लसीचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. सध्या कोरोनाची साखळी तोडणे गरजेेचे असल्याने लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कळत नकळत कोरोनाचा प्रसार होत आहे. हे सर्वात घातक आहे. राज्यात तरुण पिढीलाही कोरोनाची लागण होतेय. कडक लॉकडाऊनची गरज आहे. नाहीतर परिस्थिती गंभीर होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, असे मत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे राज्यात संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.