NASA नं शेअर केले भारताचे आश्चर्यकारक फोटो, जे आजपर्यंत कधी झालं नाही ते ‘लॉकडाऊन’नं करून दाखवलं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रसार जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये झाला असून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार जगातील एक लाख ८० हजार लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. तसेच हा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे वाहनांची ये-जा जवळजवळ बंदच आहे, बहुतेक कारखाने बंद आहेत आणि लोक आवश्यक कामांसाठीच घराच्या बाहेर जात आहेत.

हा लॉकडाऊन कोरोनाच्या संक्रमणाशी लढायला मदत करत असून त्याचा वातावरणावर देखील विस्मयकारक परिणाम दिसत आहे. लॉकडाऊनमुळे प्रदूषणाची पातळी झपाट्याने खाली आली आहे. भारतातील प्रदूषणाची समस्या जशी काय संपुष्टात आली आहे, याबाबत अमेरिकेची अंतराळ संस्था नासानेही उपग्रह फोटो शेअर करून याची पुष्टी केली आहे.

नासाने उपग्रह फोटो प्रसिद्ध करत म्हटले कि भारतातील प्रदूषणाची पातळी कमी झाली आहे. भारतात २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू असून येथे राहणारे जवळपास १३० कोटी लोक आपापल्या घरात आहेत. देशात लॉकडाऊनमुळे कारखाना, कार, बस, ट्रक, ट्रेन, विमानांचे उड्डाण बंद आहे. हे थांबल्यानंतर नासाच्या उपग्रह सेन्सरने भारताची जी प्रतिमा कॅप्चर केली आहे, ती आश्चर्यकारक आहे. नासाच्या मते उत्तर भारतातील वायू प्रदूषणाची पातळी सर्वात खालच्या स्तरावर आहे. नासाने सांगितले की, उपग्रह आकडेवारीवरून लक्षात येते कि कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून उत्तर भारतातील वायूजनित कणांची पातळी लक्षणीय घटली आहे.