home page top 1

लोकसभा २०१९ : खा. आढळराव पाटलांसह शिवसेनेचे ‘हे’ ४ खासदार ‘डेंजर’ झोनमध्ये

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. आता प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. महाराष्ट्राचा विचार करता एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी आणि दुसरीकडे भाजप शिवसेनेची तगडी युती. भाजप शिवसेनेच्या युतीमुळे यंदाच्या निवडणुकीत नाट्यमय निकाल पाहायला मिळणार यात शंका नाही युती झाल्यानंतर मात्र शिवसेनेच्या आमदार खासदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. शिवसेना आणि भाजपमधील पक्षातील आमदार खासदारांची समजूत काढताना पक्षश्रेष्ठींना नाकीनऊ आले होते. शिवसेनेच्या भाजप युतीवरून आजही शिवसेनेवर टोलेबाजी सुरु आहे असे असताना सेनेच्या हक्काच्या मानल्या जाणाऱ्या मतदार संघांमध्ये यंदा सुरुंग लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जाणाऱ्या शिरूर ,परभणी, औरंगाबाद मतदार संघात यंदा मात्र हक्काचे गड हातचे जाण्याची शक्यता आहे.

मागच्या काही निवडणुकांचा विचार करता मुंबईतील काही मतदार तसे, ठाणे, रायगड तसेच मराठवाड्यातील काही मतदार संघ म्हणजे शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जात होते मात्र आता याठिकाणी हळूहळू सेनेची पीछेहाट झाल्याचे चित्र आहे. शिरूर, परभणी, रायगड आणि औरंगाबाद मतदार संघात देखील अशीच काहीशी परिस्थिती यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे.

रायगड लोकसभा मतदार संघ
रायगड लोकसभा मतदार संघात शिवसेनेकडून काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्या अटीतटीचा सामना झाला होता. शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गीते यांनी २११० या अल्प मताधिक्याने निवडून आले होते. आता यंदा देखील रायगड लोकसभा मतदार संघात पुन्हा या दोघांमध्ये लढत होणार आहे. मागील निडणुकीत शेकापने स्वतंत्र उभ्या केलेल्या उमेदवारामुळे गीतेंना लोकसभेची वाट सोपी झाली होती; परंतु शेकापचा लालबावटा आता तटकरेंच्या बाजूने उभा राहिल्याने गीतेंसमोर आव्हान उभे राहिल्याचे चित्र आहे. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये जातीच्या समीकरणाचा विचार केल्यास मराठा, कुणबी, आगरी, कोळी, माळी, दलित, मुस्लीम या समाज घटकांचा प्रामुख्याने प्रभाव आहे. या मतदार संघात जरी शिवसेनेचा खासदार असला तरी या मतदार संघामध्ये शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्याने त्यांचा चांगलाच दबदबा निर्माण झाला आहे.

सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. रायगड जिल्हा परिषदेवर शेकापसोबत ते सत्तेवर असल्याने त्यांचे लक्ष जिल्ह्यावर आहे. विकासकामे, भूमिपूजन बैठका अशा निमित्ताने ते जिल्ह्यात असतात. त्यांचे रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यात घर असल्याने कार्यकर्ते पदाधिकारी यांना ते सहज भेटतात. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे जाळे विखुरलेले आहे. बहुजन वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे मुस्लीम, दलित अशी व्होट बँकही ते सांभाळून आहेत. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत विरोधात असणारे शेकाप तटकरेंसोबत असल्याने कार्यकर्त्यांचा विश्वास दुरावल्याचे चित्र आहे.

परभणी लोकसभा मतदार संघ
परभणी लोकसभा मतदार संघात शिवसेनेने गेल्या पाच वर्षात आपला प्रभाव कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे या मतदार संघात शिवसेनेकडून प्रत्येकवेळी उमेदवार बदलण्यात आला तरी देखील याठिकाणी शिवसेनेचा उमेदवाराचा निवडून आला आहे. २०१४ च्या निवडणुकीत संजय जाधव हे शिवसेनेकडून निवडून आले. त्यांना १ लाख २७ हजारांनी मताधिक्य मिळाले होते. आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील शिवसेनेकडून संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राजकीय तज्ञांच्या मते याठिकाणी शिवसेनेचे पारडे थोडे जड आहे मात्र राष्ट्रवादी देखील तगडे आव्हान निर्मण करतील. जाधव यांच्या तुलनेत विटेकर नवीन आहेत. त्यांना कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी आहे. गणेश दुधगावकर हे देखील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते पण ते शिवसेनेतून बाहेर पडले. त्यामुळे त्यांच्याविरोधात शिवसैनिक थेट दंड थोपटून उभे राहतील त्यामुळे पक्षाच्या नेतृत्वाने विटेकर यांना उमेदवारी दिली. असे सांगण्यात येत आहे.

याठिकाणी बहुजन वंचित आघाडीकडून आलमगीर खान यांना उमेदवारी दिली आहे. परभणी मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. तेव्हा ते देखील दोन्ही उमेदवारांना चांगली लढत देऊ शकतील अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघ
शिरूर लोकसभा मतदार संघाची यंदाची निवडणूक अधिक उत्कंठा वाढवणारी आहे. या मतदार संघात शिवसेनेकडून विद्यमान खासदार आढळराव पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र यंदा या मतदार संघात राष्ट्रवादीकडून सेलिब्रेटी उमेदवार अमोल कोल्हे निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. शिरूर मतदार संघात आढळराव पाटील यांचा चांगलाच दबदबा आहे. खासदार पदाची त्यांनी हॅट्रिक केली आहे. यावेळी चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आढळराव यांचा स्थानिक पातळीवर संपर्क चांगला आहे.

मात्र ‘छत्रपती संभाजी राजे’ या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या अमोल कोल्हे यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे करून राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी राजकीय स्ट्रॅटेजी वापरत आढळराव पाटील यांना तगडे आव्हान दिले आहे. साहजिकच सेलिब्रेटी उमेदवारांना त्यांच्या सेलिब्रेटी असल्याचा निवडणुकीत फायदा होतो हे आपण यापूर्वी देखील पाहिले आहे. शिरूरच्या बाबतीत असेच काहीसे होणार याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच आढळराव पाटील यांनी कोल्हे यांच्यावर टीका करताना जातीचा उल्लेख केला होता. त्याचवरुन याठिकाणाचे राजकारण अधीकच तापले होते. त्यामुळे या मतदार संघात शिवसेनेच्या किल्ल्याला सुरुंग लागण्याची दाट शक्यता राजकीय तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

औरंगाबाद मतदार संघ
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात भाजप शिवसेना युतीकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खैरे हे पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला मनाला जातो. काँग्रेस राष्ट्रवादीतून सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून इम्तियाज जलिल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील मैदानात आहेत. त्यामुळे यंदा या मतदार संघात रंगतदार लढत होणार आहे.

उमेदवारांची घोषणा होईपर्यंत या मतदार संघात नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजप सेनेकडून खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र आघाडीकडून खैरेंविरोधात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादीकडून झांबड यांना उमेदवारी मिळाल्यानंतर नाराज झालेल्या अब्दुल सत्तार यांनी अपक्ष लढवण्याची भूमिका घेतली होती मात्र. नंतर त्यांनी अपक्ष लढणार नाही असे संगितले. त्यानंतर त्यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता खैरे यांना याचा अधिक फटका बसू शकतो.

औरंगाबादेत कचरा, पाणी या प्रश्नांमुळे विकासाचा मुद्दा तर लांबच पण येथील नागरिकांची या कारणावरून शिवसेनेवर नाराजी आहे. याचा फटका यंदाच्या निवडणुकीत खैरे यांना बसू शकतो. मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देणारा पहिला आमदार त्यामुळे नव मतदार मराठा युवकांमध्ये हर्षवर्धन जाधव लोकप्रिय आहे. हा मतदार शिवसेनेकडे जाणारा किंवा शिवसेनेची बेधडक पद्धत मान्य होणारा आहे. त्याचा मोठा फटका खैरेंना बसू शकतो. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेत असतानाच खासदार खैरेंच्या विकास कामांचा पर्दाफाश केला होता. शिवसेना महाआघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचा थेट होण्याची जास्त शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे औरंगाबादेत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Loading...
You might also like