“पंतप्रधान मोदी ‘गांजा’ ओढून भाषण करतात का ? याची चौकशी झाली पाहिजे”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रचाराचे रण तापू लागले असून आता एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडण्याचे राजकारण राजकीय पक्षांमध्ये रंगू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शराबी म्हणत विरोधी पक्षावर टीकेची राळ उडवून दिली होती. याच विधानाचा धागा पकडून आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नरेंद्र मोदी गांजा ओढून भाषण करत नाहीत ना याची चौकशी केली पाहिजे असे खासदार संजय सिंह यांनी म्हणले आहे.

नरेंद्र मोदी यांनी सपा बसपा यांच्या आघाडीचा उल्लेख करताना त्यांना शराबी पार्टी म्हणले होते. त्या भाषणावर संजय सिंह यांनी सडकून टीका केली आहे. मोदींनी किती खोट बोलले पाहिजे याची त्यांनाच शुद्ध राहिली नाही. लोकांची काहीच कामे केली नाहीत तरी ते लोकांपुढे मते मागण्यासाठी उभे राहिले आहेत असे संजय सिंह म्हणाले आहेत. त्यांनी मोदींवर टीका करताना शोले चित्रपटातील एका प्रसंगाचा देखील आधार घेतला आहे.

महागाई तुमचे खिशे कापत आहे. सध्या पेट्रोल ९५ रुपये आणि डिझेल ८५ रुपये लिटर विकले जाते आहे. दिल्लीत महिला सुरक्षित नाहीत हे मोदी सरकारचे अपयश आहे. त्याच प्रमाणे १५ लाख रुपये देण्याचे काय झाले याबद्दल भाजप आणि मोदी बोलत नाहीत असे संजय सिंह म्हणाले आहेत. त्यांच्या या टीकेमुळे भाजपकडून त्यांना शाब्दिक चकमकीत घेरण्याचा प्रयत्न करण्यात येण्याची शक्यता आहे.