निवडणूक निकाल लागताच मोदींनी ट्विटर बाबतीत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूक पार पडली,आणि यात भाजपने ३५० जागा जिंकत पुन्हा एकदा सरकार स्थापन केले. या सगळ्यात मोदींनी सोशल मीडियावर ज्या प्रकारे कॅम्पेन केले ते खूपच वेगळे होते. या सगळ्यात मोदींचे ‘चौकीदार’ हे कॅम्पेन फार लोकप्रिय झाले. मात्र आता या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवरून ‘चौकीदार’ हा शब्द हटवला आहे.

या आधी नरेंद्र मोदींनी एक ट्विट करत हा शब्द आपल्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असेल असे म्हटले आहे. त्याचबरोबर पुढे त्यांनी लिहिले आहे कि, आता ती वेळ आलीय की चौकीदाराच्या भावनेला आता पुढल्या टप्प्यावर घेऊन जाऊया. ही भावना प्रत्येक क्षणी जिवंत राहावी, यासाठी भारताच्या प्रगतीचं काम असंच पुढे सुरू राहील असेदेखील त्यांनी पुढे लिहिले आहे.

एक्झिट पोलमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणात जागा मिळतील असं दाखवण्यात आले होते आणि त्याचप्रमाणे त्यांच्या जागा आल्या देखील. त्यामुळे काल विजयानंतर मोदींनी सभा घेत भारतीय जनता पार्टी आणि मतदारांचे आभार मानले. चौकीदार या कॅम्पेनमध्ये मोदींनी नावासमोर चौकीदार लावल्यानंतर भाजपमधील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील आपल्या नावापुढे चौकीदार हा शब्द लावून मोदींना आपला पाठिंबा दर्शवला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करताना ‘चौकीदार चोर है’ असे म्हटले होते.

दरम्यान, नरेंद्र मोदी ३० मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.