आमदाराला बुटाने मारहाण करणाऱ्या ‘त्या’ भाजप खासदाराला पक्षाकडून ‘नारळ’

लखनौ : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलेल्या खासदाराने आमदाराला मारहाण केल्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्ही गेल्या महिन्यात पाहिला असेल. यामुळे व्हिडिओमुळे भाजपची देशभर नाचक्की झाली. त्यामुळे बुटाने केलेली मारहाण करणारे खासदार शरद त्रिपाठी यांना चांगलीच भोवली आहे. पक्षाने त्यांना तिकीट नाकारले आहे.

उत्तर प्रदेशामधील आणखी सात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी भाजपने सोमवारी रात्री उशिरा जाहीर केली. या यादीतून संत कबीरनगरमधून शरद त्रिपाठी यांचा पत्ता कट केला. उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगरमध्ये मार्च महिन्यात झालेल्या भाजपच्या बैठकीत शरद त्रिपाठी यांनी आमदार राकेश बघेल यांना बुटाने मारहाण केली होती.

भाजपने शरद त्रिपाठी यांचे तिकीट कापले असले तरी त्यांचे वडिल आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रमापतीराम त्रिपाठी यांना देवरिया मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीतून पाच खासदारांचे नाव कापण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्री मुकुट बिहारी वर्मा यांना आंबेडकरनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.