Loksabha : मी कुठल्याही पक्षात जाणार नाही; ‘या’ नेत्याचे स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचा राजीनामा दिलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर सत्तार यांनी स्पष्टिकरण दिल आहे. भाजपमध्ये जाण्याचा कुठलाही विचार नाही, असं त्यांनी स्पष्ट केले आहे. तसंच ज्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचे दिल्लीत कुणी ऐकत नसेल तर मी कसे ऐकू? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. गेल्या काळात मुख्यमंत्र्यांनी जी मदत मला केली त्यासाठी आभार मानायला मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. मी सगळ्याच पक्षातील नेत्यांचे आभार मानणार आणि त्यांचे आशीर्वाद घेणार आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

छत्तीस वर्षे काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर न्याय मिळाला नाही याची खंत वाटतेय. त्यामुळे मी आता जनतेच्या दरबारात न्याय मागणार आहे. निवडणूकीनंतर काय करेल, कुठल्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही. सध्यातरी अपक्ष लढणार आहे, असं त्यांनी सांगितल. तसंच येत्या काळात मुलाला सिल्लोड विधानसभेसाठी अपक्ष उभा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, सत्तार यांनी अशोक चव्हाणांच्या भूमिकेवरही त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. मला अशोक चव्हाणांवर टीका करायची नाही. मी त्यांना धन्यवाद देतो. नेत्यांच्या विरोधात बोलणं माझ्या तोंडी चांगलं वाटत नाही. मी औरंगाबादची जागा मागितली होती. मला जालना लोकसभा मतदारसंघातून उभे राहण्यासाठी काँग्रेसनं सांगितलं होतं, असंही त्यांनी म्हटलं.