”मी तुमच्यासोबत जगणार तुमच्यासोबतच मरणार” : अशोक चव्हाण

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी प्रत्येक पक्षातील नेत्यांनी कंबर कसली आहे. जनतेपर्यंत पोहचण्याची कोणतीही संधी हे नेते सोडत नाहीत. राजकारणाच्या जोरदार प्रचाराला नांदेडमध्ये भावनिक वळण लागले आहे. नांदेडमधील एका प्रचारसभेमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी तेथील जनतेला भावनिक साद घातली आहे. मी तुमच्यासोबत जगणार तुमच्यासोबतच मरणार, असं भावनिक वक्तव्य अशोक चव्हाणांनी केले आहे. तसंच मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

मला चक्रव्यूहात अडवलं जात आहे. मी तुमच्यासोबत जगणार आणि तुमच्यासोबतच मरणार, असं भावनिक आव्हान अशोक चव्हाणांनी यावेळी केले. नांदेडची राजकारणाची रंगत वाढत असताना अशोक चव्हाणांनी तेथील जनतेला भावनिक करत आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नांदेडच्या राजकारणात खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. तसंच मुख्यमंत्र्यांच्या नांदेडमध्ये एकूण तीन प्रचारसभा झाल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही एक सभा नांदेडमध्ये झाली होती. यासभांना लोकांनी चांगला प्रतीसाद दिला. त्यामुळे तेथील वातावरण भाजपच्या बाजूने झाल्याचे दिसून येत होते. त्यावर आता अशोक चव्हाणांनाही परिस्थितीचा अंदाज घेत तेथील जनतेला भावनिक साद घातली आहे. मात्र ही साद जनतेवर किती परिणाम करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.