Loksabha : काँग्रेसची डोकेदुखी वाढणार, सप-बसप लढविणार राज्यातील सर्व जागा

मुंबई : वृत्तसंस्था – काँग्रेसने युपीमध्ये गठबंधनापासून दूर ठेलेले सप आणि बसप हे महाराष्ट्रात काँग्रेसची डोकेदुखी ठरु शकते. सप आणि बसपने महाराष्ट्रातील सर्व जागा लढवणार असल्याचे सांगितले आहे. तर महाराष्ट्रात असुद्दीन ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे. या दोन आघाडीमुळे मुस्लीम मतांमध्ये विभाजन होऊ शकते. याचा फटका काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बसू शकतो.

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी महाराष्ट्रातही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व ४८ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही आघाडी लोकसभेबरोबरच विधानसेसाठीही कायम राहणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. बसपच्या नेत्या मायावती उमेदवारांच्या प्रचारासाठी पुढील महिन्यात सभा घेणार असल्याची माहिती आझमी यांनी दिली.

काँग्रेसमुळे राज्यात धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होत असल्याचा आरोप आझमींनी केला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेसने सपने मागितलेली एक जागा द्यायला हवी होती. मात्र, काँग्रेसने चर्चेची तयारीही दाखवली नाही. त्यामुळेच, महाराष्ट्रातही सप आणि बसपने एकत्र येण्याचा निर्णय केला. आझमी म्हणाले की, काँग्रेससोबत महाराष्ट्रात आघाडी करण्यासाठी आमचा विचार सुरू होता. मात्र, काँग्रेसने दाद दिली नाही, असा आरोप आझमी यांनी केला.

बसपचे खासदार अशोक सिद्धार्थ म्हणाले की, महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांतील जातीची समीकरणे बघून उमेदवार घोषित केले जातील. बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. वंचितच्या नेत्यांनी आजवर एकदाही आमच्याशी संपर्क साधलेला नाही.