खळबळजनक ! पुण्यात बोगस मतदान, गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात विविध मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. बिबवेवाडी परिसरात असलेल्या बुथ क्रमांक २८७ वर बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती पत्नी मतदान करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या आधी कुणीतरी त्यांच्या नावावर मतदान करून गेले होते. त्यानंतर त्यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दिनेश अगरवाल यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सुरुवात झाली. पुणे लोकसभा मतदार संघातील बिबवेवाडीतील बुथ क्रमांक २८७ कामगार राज्य विमा महामंडळ पंचदीप भवन येथे सकाळपासून मतदान करण्यासाठी नागरिक येत होते. त्यावेळी सकाळी आठ वाजता दिनेश अगरवाल व त्यांच्या पत्नी असे दोघे मतदान करण्यासाठी बुथवर गेले. त्यावेळी त्यांना निवडणूक कर्मचाऱ्याने त्यांच्या नावावर मतदान झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात पुन्हा पडताळणी केली. तेव्हा त्यांच्या नावावर कुणीतरी आधीच मतदान करून गेले होते. अगरवाल यांना मतदानाचा हक्क त्यामुळे बजावता आला नाही. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात मार्केट यार्ड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.