दुचाकी चोरणाऱ्या 7 जणांना लोणीकंद पोलिसांनी केले अटक

वाघोली : प्रतिनिधी  (कल्याण साबळे पाटील) –  लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुचाकी चोरणाऱ्या सात जणांना लोणीकंद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या आठ दुचाक्यादेखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

अक्षय विजय सूर्यवंशी, अजय दीपक चव्हाण, गणेश हनुमंता मंगवडे (तिघेही रा. लोणीकंद), रशीद मेहबूब शेख (रा. मुखेड, नांदेड), निलेश लिंबराज आडमुठे (रा. आष्टापुर) सलमान बाबु शेख (रा. पेरणे फाटा), रियाझ मेहबूब शेख (रा. कोरेगाव भीमा) असे दुचाकी चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

वाघोलीसह लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाहन चोरींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना गुन्हे शोध पथकाने याकडे लक्ष केंद्रित करून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा तपास केला आणि वेगवेगळ्या गुन्ह्यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या अक्षय सूर्यवंशी, गणेश मंगवडे, सलमान शेख यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत तसेच इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कारवाई हवेलीच्या डीवायएसपी सई भोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे केली आहे.