गॅस दरवाढीविरुध्द अनोखं आंदोलन; नववधूच्या हातच्या भाकरी PM मोदींना ‘पार्सल’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच महाग झाले आहेत. त्यात अजून एक भर म्हणजे गॅस दरवाढ. गॅस दरवाढीचा फटका सर्वांना बसला आहे. गॅस दरवाढीविरुध्द देशात ठिकठिकाणी आंदोलने होताना दिसतात. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात गॅस दरवाढीविरुध्द एका अनोख्या प्रकारे आंदोलन केले आहे. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने २८ डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर केले आहे. या आंदोलनात महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा मनीषा पाटील, संगीता फाटक, अंजली जाधव, रोहन गव्हाणे, कृष्णा पाटील, सईद काझी आदी उपस्थित होते.

येथील महामार्गावर नववधूच्या हस्ते चूल पेटवून त्यावर भाकरी भाजण्यात आल्या. यामध्ये नववधूच्या हस्ते चूल पेटवून गॅस पेटवून गॅस सिलिंडर दरवाढीच्या निषेध नोंदविला आहे. एवढ्यावरच न थांबता चुलीवर भाजलेल्या भाकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टाद्वारे पाठवण्यात आल्या आहेत. हे वेगळ्या प्रकारचं आंदोलन महिला कार्यकर्त्यांनी सोलापूर-धूळे (२११) राष्ट्रीय महामार्गावर केलं. केंद्राने तातडीने दरवाढ मागे घ्यावी नाहीतर राष्ट्रवादी जिल्हा महिला आघाडीच्यावतीने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी दिला.