1300 पदांचा भरती घोटाळा प्रकरण : SIT च्या तपासात समाजवादी पार्टीचे खासदार आजम खान दोषी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रामपूरचे सपाचे खासदार आणि माजी नगरविकास मंत्री आजम खान यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सपा सरकारमधील जल निगम भरती घोटाळ्याची चौकशी करणार्‍या एसआयटी (SIT) ने आजम खान यांना दोषी ठरवले आहे. आजम खान यांच्यावर १२२ सहायक अभियंता, ८५३ कनिष्ठ अभियंता यांच्यासह एकूण १३०० पदांच्या भरती प्रक्रियेत अनियमितता केली असा आरोप आहे. २०१६-१७ मध्ये जल निगम भरती मंडळाचे ते अध्यक्ष असताना एकूण १३०० पद भरतीत अडथळा निर्माण झाला होता. उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी एसआयटीकडे सोपविण्यात आली होती.

हे प्रकरण समोर आल्यानंतर भरती प्रक्रिया रद्द कण्यात आली होती. या प्रकरणात माजी नगरविकास मंत्री आजम खान, नगर विकास सचिव एसपी सिंह, जल निगमचे माजी एमडी पीके असुदानी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. एसआयटीने सर्व अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. या चौकशी दरम्यान आजम खान यांना दोषी ठरविण्यात आले आहे. एसआयटीच्या तपासणीत भरतीची प्रक्रिया पूर्णपणे चुकीची असल्याचे आढळून आले. सध्या एसआयटीने तपास पूर्ण करून आपला अहवाल सरकारकडे सादर केला आहे.

सपाच्या कारकिर्दीत वर्ष २०१६ च्या शेवटी जल निगम मध्ये १३०० पदांची भरती काढण्यात आली होती. जल निगम विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी यासंदर्भात तक्रार केली होती, त्यानंतर चौकशी सुरू झाली. या प्रकरणात सरकारने यापूर्वीच १२२ सहायक अभियंत्यांना काढून टाकले आहे. नंतर हा तपास सरकारने एसआयटीकडे सोपविला. या प्रकरणात एसआयटीने आजम खान समवेत अनेक लोकांची चौकशी केली होती, ज्यात माजी नगरविकास सचिव एसपी सिंग यांचा देखील समावेश होता.