हॉस्पीटलमध्ये पोहचण्यापुर्वी रस्त्यातच संपला सरकारी अ‍ॅम्ब्युलन्समधील ऑक्सीजन, रूग्णाचा मृत्यू

मधेपुरा : देश कोरोना संकटाच्या काळातून वाटचाल करत आहे. आरोग्य विभाग हाय अलर्टवर आहे, सरकार आणि प्रशासन सुविधांचा उदोउदो करताना थकत नसल्याचे दिसत आहे. परंतु, अ‍ॅम्ब्युलन्समधील ऑक्सीजन संपल्याने रूग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे.

बिहारच्या मधेपुरा मेडिकल कॉलेजशी संबंधीत ही घटना आहे. 2 ऑगस्टला अररिया जिल्ह्यातील नरपतगंज येथील रहिवाशी बलदेव लाल देव हे कोरोना संक्रमित असल्याने त्यांना जेकेटीएमसीएच मधेपुरामध्ये दाखल करण्यात आले होते. व्हेंटिलेटरअभावी त्यांचा मृत्यू झाला.

त्यांचे कुटुंबिय सांगतात की, सुमारे 15 मिनिट व्हेंटिलेटवर ठेवल्यानंतर त्याचा प्लग खराब झाला. ईश्वराच्या कृपेने व्हेंटिलेटरशिवाय केवळ ऑक्सीजनवर त्यांनी कोरोनाशी लढा जिंकला. वय जास्त होते म्हणून श्वास घेण्यास त्रास होत होता. डॉक्टरांनी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने पाटणा येथे रेफर केले. मृताचा नातू मेडिकल कॉलेजच्या लाईफ सपोर्ट अ‍ॅम्ब्युलन्सने आजोबांना घेऊन पाटणासाठी निघाला, परंतु मधेपुरापासून 22 किलोमीटर अंतरावर त्रिवेणीगंजच्या जवळपास अ‍ॅम्ब्युलन्समधील ऑक्सीजन संपला.

यानंतर त्रिवेणीगंज हॉस्पीटलला पोहचेपर्यंत रूग्णाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अ‍ॅम्ब्युलन्स चालक सुद्धा फरार झाला. ज्यामुळे 4 तास मृतदेह अ‍ॅम्ब्युलन्समध्ये पडून होता. या दरम्यान, मृताच्या नातवाने अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांना फोन सुद्धा केले परंतु कुणीही सहकार्य केले नाही.

बलदेव लाल यांच्या मृत्यूने आरोग्य खात्याची पोलखोल केली आहे. मृताचा नातू आयुष कुमार यांनी आपल्या आजोबांच्या मृत्यूनंतर मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना रूग्णांच्या उपचारात बेजबाबदारपणाही उघड केला आहे. याप्रकरणात हॉस्पीटल व्यवस्थापनाने आपली बाजू अद्याप मांडलेली नाही.