मद्रास उच्च न्यायालयाने किरण बेदींना फटकारले

पुद्दुचेरी : वृत्तसंस्था – सरकारी कामात हस्तक्षेप करू नका असे आदेश देत मद्रास उच्च न्यायालयाने पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना फटकारले आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांना मोठा दिलासा मिळला आहे. पुद्दुचेरीच्या दैनंदिन कामकाजामध्ये ढवळाढवळ करण्याचे अधिकार तुम्हाला नाहीत, अशा शब्दात न्यायालयाने किरण बेदी यांना फटकारले.

मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार तसेच कोणतीही कागदपत्रे मागण्याचा अधिकार राज्यपालांना नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. काँग्रेसचे आमदार लक्ष्मीनारायणन यांनी २०१७ मध्ये मद्रास उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये त्यांनी नायब राज्यपालांना दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का अशी विचारणा केली होती.

मुख्यमंत्री नारायणस्वामी यांच्या प्रशासकीय अधिकारावरून त्यांचे आणि किरण बेदी याच्यात अनेकवेळा खटके उडाले आहेत. किरण बेदी या केंद्राच्या आदेशावरून दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता. मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयावर सही करणे एवढे काम नायब राज्यपालांचे असताना देखील किरण बेदी या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता. याबद्दल किरण बेदी यांनी नाराजी व्यक्ती करत मुख्यमंत्री अवघ्या आठवड्याभरात पत्रांना उत्तर द्या असे सांगतात. तसेच त्यासाठी ते धरणे आंदोलन करतात. मुख्यमंत्र्याची ही कृती वाईट असल्याचे किरण बेदी यांनी म्हटले होते.