यंदा ‘महाराष्ट्र केसरी’ ही मानाची कुस्ती स्पर्धा होणार, पण ‘या’ पद्धतीने

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे सर्व क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. क्रीडा क्षेत्रावर देखील परिणाम झाला असून अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या तर काही स्पर्धांचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असून मानाची मानली जाणारी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा भरवण्यास परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे.

फेब्रुवारीच्या अखेरीस ही स्पर्धा पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात पार पडण्याची शक्यता आहे. हिंदकेसरी आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सदस्य पै. योगेश दोडके यांनी ही माहिती दिली आहे. लवकरच यासाठी निवड चाचणीला सुरुवात होईल, असेही दोडके यांनी सांगितले.

या स्पर्धेच्या आयोननासंदर्भात राज्य कुस्तीगीर परिषद राज्य सरकारसोबत पाठपुरावा करत होती. याला यश मिळाले असून स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला आहे. 17 जानेवारीला कुस्ती परिषदेच्या कार्यकारणीच्या सभेत स्पर्धेच्या तारखा निश्चित केल्या जातील अशी अपेक्षा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तांबड्या मातीतील मल्लांचा शड्डूचा आवाज बंद झाला होता. मात्र, आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने कुस्ती शौकिनांना प्रत्यक्षात या लढती पाहता येणार आहेत.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाही सरकारने कोरोना संबंधीत जारी केलेल्या आदेश आणि नियमांचे पालन करुन पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), क्रीडामंत्री सुनिल केदार (Sports Minister Sunil Kedar) आणि क्रीडा आयुक्त डॉ. ओमप्रकाश बखोरिया (Sports Commissioner Dr. Omprakash Bakhoria) यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनासंदर्भात हिरवा कंदील दाखवला आहे.