शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर नमिता मुंदडा ‘त्या’ पोस्टमुळं चर्चेत, पक्षाचा आणि साहेबांचा फोटो गायब

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच बीडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची आपल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. त्यात जाहीर केलेल्यांपेकी एक उमेदवार नमिता मुंदडा. मात्र त्या सध्या चर्चेत आहेत त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे, ज्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. कारण नमिता मुंदडा याच्या पोस्टमधून राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पवार साहेब यांचा फोटो गायब आहेत.

शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन राष्ट्रवादीच्या ज्या पाच उमेदवारांची घोषणा केली. त्यापैकी नमिता मुंदडा या एक उमेदवार आहेत. विमल मुंदडा यांच्या त्या सुनबाई आहेत. मुंदडा कुटुंबाचे धनंजय मुंडे आणि बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यासोबत कधीही पटले नाही. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीमधील गटबाजी समोर आली आहे.

नमिता मुंदडा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले कि, ‘स्व.डॉ. सौ.विमलताई मुंदडा यांनी ह्या गेली २५ वर्षे लोकांच्या हितासाठी काम करत होत्या, आपल्या मतदारसंघातील प्रत्येकाबरोबर त्यांनी कौटुंबिक नाते बनवून आपल्या जनतेसाठी काम केले आहे. मार्च २०१२ मध्ये विमलाताई यांचे निधन झाले. तरी कुठलेही पद नसताना मागील ७ वर्षांपासून आमच्या संपूर्ण कुटुंबाने लोकांच्या हितासाठी काम करत आहोत. हेच काम मला पुढे सुरु ठेवायचे आहे आणि मतदारसंघाचा विकास करायचा आहे, त्यामुळे येत्या विधानसभेसाठी मी उभी राहणार आहे. आपला आशिर्वाद असावा, ही नम्र विनंती.’ त्यांच्या या पोस्ट मध्ये राष्ट्रवादी पक्षाचे किंवा शरद पवार यांचा फोटो देखील नव्हता. त्यामुळे अनेक चर्चा रंगविल्या जात आहेत.

शरद पवार यांनी बीडमध्ये ५ उमेदवारांची नवे जाहीर केली त्यात परळी विधानसभा मतदारसंघातून – धनंजय मुंडे , बीड मतदार संघातून – संदीप क्षीरसागर, माजलगाव – प्रकाश सोळके, गेवराई येथून – विजयसिंह पंडित तर केज – नमिता मुंदडा अशी जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे आहेत.

Visit :- policenama.com