फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, म्हणाले -‘महाराष्ट्र हे आता आत्महत्येचं डेस्टिनेशन होतंय का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. तर रायपूर येथील एका सरकारी अधिकाऱ्याने नागपूर येथे आत्महत्या केली. डेलकर यांच्या आत्महत्येवरुन आज सभागृहात मोठा गदारोळ झाला. भाजपचं प्रशासन असलेल्या राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन आत्महत्या करत असून महाराष्ट्र सरकारकडून त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्याने ते सुसाइड नोटमध्ये कारवाई करण्याची मागणी करत आहेत, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले. रायपूर हे मध्य प्रदेशात येत असल्याचा दावा अनिल देशमुख
यांनी यावेळी केला.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या रायपूर मध्य प्रदेशात येत असल्याचा दावा खोडून काढताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची माहिती करुन घ्यावी की रायपूर हे मध्य प्रदेशात नाही तर छत्तीसगडमध्ये येते. सध्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. महाराष्ट्रात येऊन लोक आत्महत्या करीत असतील तर गृहमंत्र्यांना आनंद होत असेल तर हा महाराष्ट्र आता पर्यटनाचा नाही, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का ? याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी द्यावी, असा घणाघात फडणवीसांनी केला.

दरम्यान, डेलकर यांनी सुसाइड नोटमध्ये उल्लेख केलेले प्रफुल खेडा पटेल हे दादरा-नगर हवेलीमध्ये प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. ते यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री होते. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना खेडा पटेल हे गुजरातचे गृहमंत्री होते, असा माझा कयास असल्याचं अनिल देशमुख म्हणताच सभागृहात एकच गदारोळ उडाला.