Maharashtra : कोरोनाने आतापर्यंत 389 पोलिसांचा मृत्यू; गेल्या 16 दिवसात 25 जणांनी गमावला जीव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाची दुसरी लाट पूर्वीपेक्षा अधिक तीव्र असल्याचे समोर आले आहे. या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या वाढत चालली असून मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. दरम्यान , कोरोनामुळे गेल्या १६ दिवसात २५ पोलिसांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. आता पर्यंत राज्यतील ३८९ पोलिसांनी गमावला आहे.

कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम पोलिसांकडून होत असते.सध्या पोलीस जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णालये, कोविड सेंटर, प्रतिबंधित क्षेत्र, अशा ठिकाणच्या बंदोबस्तासह अन्य सर्व प्रकारची कर्तव्ये काटेकोरपणे बजावत आहे. मात्र आपले कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यापर्यंत अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत राज्यात ३८९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील २५ मृत्यू हे मागील १६ दिवसांतील आहेत. यात मुंबई पोलीस दलातील ३ पोलिसांचा समावेश आहे, तसेच पुणे, धुळे, नाशिकसह एसआरपीएफच्या जवानही आहेत.

मी लवकरच कामावर येईन म्हणत सोडले प्राण
राज्याच्या सायबर विभागातील सायकलिस्ट अशी ओळख असलेले पोलीस हवालदार हर्षल रोकडे (वय ३६) यांना कोरोनाची बाधा झाल्याने १० एप्रिलपासून त्यांच्यावर सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना दोन तीन दिवसात घरी सोडण्यात आले. त्यांनी लवकरच कामावर परतणार असल्याचे आपल्या सहकार्यांना सांगितले होते, मात्र शनिवारी त्यांची ऑक्सिजनची पातळी घसरली आणि अचानक प्रकृती खालावल्याने रविवारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वांच धक्का बसला आहे. रोकडे यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, कालिना येथील कोळे कल्याण येथे २५० बेडचे कोविड सेंटर पोलिसांसाठी तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर इतरत्रही पोलिसांना विशेष सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अडीच महिन्यांत १० हजार जणांना कोरोना, ६० पाेलिसांचा मृत्यू
कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील पोलीस फ्रंटलाईनवर लढत आहेत. त्यांनाही त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या अडीच महिन्यात पोलीस दलातील १० हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६० अधिकारी-अंमलदाराना प्राण गमवावे लागले. या कालावधीत १३ पटीने सक्रिय होण्याचे प्रमाण वाढले आहे. चालू वर्षी फेब्रुवारीत ३१२ बाधित होते. आज हा आकडा ३ हजार ८७४ इतका वाढला आहे. झपाटयाने वाढत असलेल्या संसर्गाने पोलिसांच्या कुटूंबामध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

पुरेपूर दक्षता बाळगावी
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पोलीस महासंचालक संजय पांडे म्हणाले, कोरोनाला थोपवण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहे. त्यांना स्वतःच्या सुरक्षेबाबतही पुरेपूर दक्षता बाळगण्याची सूचना केली आहे. थोडी जरी लक्षणे दिसली किंवा थकवा जाणवल्यास तपासणी करण्याच्या तसेच योग्य काळजी घेण्याबाबत घटकप्रमुखांना कळविले आहे. त्याचबरोबर पोलिसांचे लसीकरणही सुरु आहे. लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्याबाबत कार्यवाही केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

२२ एप्रिलनंतर संसर्ग होण्याचा वेग वाढला
गेल्या ८२ दिवसांत कोरोनाचा संसर्ग मुंबईसह राज्यभरातील सुमारे १० हजार पोलिसांना झाला आहे. १ फेब्रीवारी पर्यंत पोलीस दलात एकूण २९ हजार ५९९ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी २८ हजार ९३७ पूर्णपणे बरे झाले. तर ३३० जणांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे ३१२ एवढेच सक्रिय रुग्ण होते. त्यानतर २२ एप्रिल नंतर हि आकडेवारी वाढू लागली
त्यानंतर एकूण ३८ हजार ९९९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यापैकी एकूण ३४ हजार ७३५ जण बरे झाले असून एकूण मृत्यूची संख्या ३०० पर्यंत वाढली. सध्या राज्यातील विविध आयुक्तालये व अधीक्षक कार्यालयांतर्गत रुग्णालयात ३ हजार ८७४ पोलीस उपचार घेत आहेत.