‘अजित पवार नेटवर्कबाहेर’ असल्याचा आरोप करणाऱ्यांचा हेतू आणि मेंदू तपासण्याची आवश्यकता’

मुंबई : अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतर बरळल्याशिवाय टीव्हीवर दिसू शकत नाही, अशी लोकं माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार चंद्रकांत पाटलांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?

पुण्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असताना पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देत नाहीत. फोनवरही ते नागरिकांना उपलब्ध होत नाही. अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करुन पुण्यात लक्ष द्यावे. अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

त्यांच्या पक्षाचे लोक मला भेटतात ते पहावे

मी नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनीधी मला भेटतात हे पहावे. मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती तर माझ्यावर असे बिनबुडाचे आरोप करण्याची हिंमत झाली नसती, असा टोला अजित पवार यांनी लगावला. तसेच टीव्हीवर चमकण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी बिनबुडाचे आरोप करुन राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करुन या संकट काळात राज्याला कमकुवत करण्याचे पाप करु नये, असा इशारा वजा आवाहन अजित पवार यांनी विरोधकांना केले.

हेतू व मेंदू तपासण्याची आवश्यकता

मी दररोज सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष भेटींना उपलब्ध असतो, मुख्यमंत्री, मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत दिवसभर संपर्कात असतो. तसेच भाजपचे आजी माजी आमदार, नेते मंडळी भेटत असतात. ते देखील मला दिवसभर फोन करतात. सोमवार ते गुरुवार सकाळी नऊ वाजता मंत्रालयात हजर असतो. पुण्यामध्ये शुक्रवार ते रविवार हजर असतो. मागील दीड वर्षापासून हा माझा कार्यक्रम सुरु आहे. कायम लोकांच्या संपर्कात राहणारा कार्यकर्ता आहे. जनतेत आणि मंत्रालयात उपस्थित असताना ‘अजित पवार नेटवर्कबाहेर’ असल्याचा आरोप करणाऱ्यांचा हेतू आणि मेंदू तपासण्याची आवश्यकता असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

रुग्णांच्या उपचारासाठी सोय करण्याला प्राधान्य

महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या भीषण संकटाशी लढा देत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना पुरेसे बेड उपलब्ध करणे, हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिव्हिर इंजेक्शनची उपलब्धता सुनिश्चित करणे, ही माझी प्राथमिकता आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी, सहकारी मंत्र्यांशी, लोकप्रतिनिधींशी, विभागीय आयुक्तांशी, जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद सुरु आहे. उद्योगक्षेत्राशी चर्चा केली जात आहे. त्यातून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

तर ‘ते’ जनतेच्या हिताचे ठरेल

राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यातून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे आणि रुग्णांना उपचार उपलब्ध करुन देणे ही सध्याची प्राथमिकता आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपचे नेते खोटे-नाटे आरोप करुन राज्यातील कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत करत आहेत. त्यांची वक्तव्ये ही राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करुन राज्याला अडचणीत आणणारी आहेत. भाजप नेत्यांनी त्यांचा वेळ आणि ताकद केंद्रकडून राज्यासाठी जास्तित जास्त मदत मिळवून देण्यासाठी वापरावी, ते जनतेच्या हिताचे ठरेल, असे अजित पवार म्हणाले.