शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी माजी CM फडणवीस यांना 15000 च्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपविल्याच्या प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सकाळी अखेर न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांची १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटका केली.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्यावरील दोन गुन्हे लपविल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. या आधी नागपूर कोर्टाने समन्स बजावून देवेंद्र फडणवीस यांना हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, त्यावेळी त्यांचे वकील कोर्टात हजर होते.

नागपूर दक्षिण -पश्चिम मतदारसंघातील देवेंद्र फडणवीस आमदार आहे. अ‍ॅड. सतीश उके यांच्या आरोपांनुसार फडणवीस यांनी आपल्या निवडणुक प्रतिज्ञापत्रात १९९६ आणि १०९८ मध्ये मानहानी, फसवणुक आणि खोट्या कागदपत्रांसदर्भात गुन्हा दाखल केला होता. परंतु, दोन्ही प्रकरणात आरोपांची निश्चिती झाली नव्हती. हे दोन्ही गुन्हे लपविल्याचा आरोप आहे.

अ‍ॅड. सतीश उके यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयापर्यंत संघर्ष केला. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१९ मध्ये या प्रकरणावर प्राथमिक (कनिष्ठ) न्यायालयाने सुनावणी करावी, असा निर्णय दिल्यानंतर नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्या समक्ष १ नोव्हेंबरपासून पुन्हा सुनावणीस सुरुवात झाली होती.

सुनावणी दरम्यान न्यायालयाने नियमाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयात उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस जारी केली होती. त्याच आधारावर गुरुवारी प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. फडणवीस यांच्यासमवेत चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. न्यायालयाने फडणवीस यांचा १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 मार्च रोजी होणार आहे.