‘मी गद्दारी केली असेल तर गोळी घाला, जोडयानं मारा’ ; सेनेच्या नेत्याचे भाजपच्या मंत्र्याला आवाहन

जळगाव : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरु असून सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असून अनेक ठिकाणी काही उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला असून राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी उडाल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळीच हा प्रकार घडल्याने शिवसेना आणि भाजपमधील खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे.

यावेळी भाजपच्या बंडखोरांवरून गुलाबराव पाटील यांनी महाजन यांना चांगलेच खडसावल्याचे दिसून आले. भाजपचे बंडखोर उमेदवार अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून फलक घेऊन प्रचार करत आहेत. लोकसभेच्या वेळी देखील तुम्ही दोनवेळा उमेदवार बदलला, मात्र आम्ही तरीही तुम्हाला पाठिंबा दिला, मात्र त्याचे हे फळ मिळणार का ? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील यासंदर्भात पत्र लिहिल्याचे देखील त्यांनी यावेळी महाजन यांना सांगितले. त्याचबरोबर आम्ही गद्दारी केली असेल तर मला गोळी मारा. जोड्याने मारा. आम्ही पाच वर्ष जनतेची कामं यासाठीच करतो का ?असा संतप्त सवाल देखील त्यांनी गिरीश महाजन यांना विचारला.

काय आहे प्रकरण
जळगाव जिल्ह्यात युतीमध्ये शिवसेनेकडे चार जागा आहेत. जळगाव ग्रामीण , पाचोरा, एरंडोल आणि चोपडा याठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत. मात्र त्या ठिकाणी भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी देखील उमेदवारी भरली असून यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना फटका बसू शकतो. भाजपच्या या बंडखोर उमेदवारांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या दोघांमधील हा वाद सर्व वृत्तवाहिन्यांनी आणि पत्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला.

मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
या सगळ्या प्रकरणावर आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. तसेच पक्षाचे चिन्ह असलेल्या उमेदवारांनाच निवडून देण्याचे आव्हान देखील त्यांनी मतदारांना केले. या वादानंतर गुलाबराव पाटील मात्र व्यासपीठावर न बसता खाली श्रोत्यांमध्ये जाऊन बसले. त्यानंतर त्यांना विनंती करण्यात आल्यानंतर ते व्यासपीठावर जाऊन बसले.

Visit : Policenama.com