‘या’ कारणामुळं मावळलेल्या सरकारची ‘पिल्लं’ खूश ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी कमी वेळ दिला होता. तसेच कोणत्याही पक्षाला बहुमत सादर न करता आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. राज्यात घडणाऱ्या या घडामोडींवरून शिवसेनेने भाजपवर सामनाच्या  ‘महाराष्ट्राचा पैसा जुगारात लावू नका’ या अग्रलेखातून टीका केली आहे.

लेखातील ठळक मुद्दे –

महाराष्ट्र ही काही जुगारावर लावण्याची ‘चीज’ नाही –
आज महाराष्ट्रात चार वेगवेगळ्या भूमिकांचे पक्ष आपापले पत्ते हाती घेऊन पिसत आहेत . राजभवनाच्या हाती ‘एक्का’ नसतानाही त्यांनी तो फेकला. जुगारात असे बनावट पत्ते फेकून डाव जिंकण्याचे प्रयत्न आतापर्यंत सफल झालेले नाहीत आणि महाराष्ट्र ही काही जुगारावर लावण्याची ‘चीज’ नाही . महाराष्ट्राने कधी कुणाच्या पाठीत वार केले नाहीत. राज्यात राष्ट्रपती राजवटीचा वरवंटा अखेर फिरवला आहे व त्याबद्दल कोणी मगरीचे अश्रू ढाळीत असतील तर त्याकडे एक ‘फार्स’ म्हणून पाहायला हवे. राष्ट्रपती राजवट दुर्दैवी असल्याची कळ माजी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या मनात आली आहे. राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्रात होणाऱ्या गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होईल अशी चिंता माजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. हे त्यांचे नक्राश्रू आहेत.

कुछ तो गडबड है –
सरकार स्थापनेसाठी किमान चोवीस तास तरी वाढवून मिळावेत अशी भूमिका घेऊन राजभवनात पोहोचलेल्या नेत्यांच्या बाबतीत जेथे राजशिष्टाचाराचेच पालन झाले नाही. आम्ही थोडा वेळ मागितला, परंतु दयावान राज्यपालांनी आता राष्ट्रपती राजवट लागू करून भरपूर वेळ दिला आहे. अर्थात महाराष्ट्रावर हा जो राष्ट्रपती राजवटीचा वरवंटा फिरवला गेला आहे याची पटकथा जणू आधीच लिहून ठेवली होती. विधानसभा सहा महिन्यांसाठी स्थगित करून राज्यपालांनी प्रशासकीय सूत्रे राजभवनाकडे घेतली आहेत. आता सल्लागारांच्या मदतीने ते इतक्या मोठय़ा राज्याचा कारभार हाकतील. राज्यपाल हे अनेक वर्षे संघाचे स्वयंसेवक होते.  इतक्या मोठ्या राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आपण 48 तासही देणार नसाल तर ”दया, कुछ तो गडबड है” असे जनतेला वाटू शकते. सहा महिन्यांची राष्ट्रपती राजवट लादता, पण दोन दिवसांची मुदत सरकार स्थापनेसाठी देत नाही.

मावळलेल्या सरकारची पिल्ले खूश-
राष्ट्रपती राजवट लादली म्हणजे महाराष्ट्रातील सत्ता परिवारातच राहिली. त्यामुळे मावळलेल्या सरकारची पिल्ले खूश आहेत हे त्यांच्या आनंदी चेहऱ्यावरून दिसत आहे. आता सरकार कोणी व कसे बनवायचे? राष्ट्रपती राजवटीचा खेळखंडोबा लवकरात लवकर कसा दूर करायचा हाच प्रश्न आहे. जे शिवसेनेच्या बाबतीत झाले तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडले. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी रात्री साडेआठपर्यंतची मुदत दिली गेली होती, पण थोडा वेळ वाढवून दिला तर बरे होईल असे विचारताच ‘8.30’ सोडाच, पण भरदुपारीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. राज्यपालांनी ही तत्परता व घटनेची आस्था पुढच्या 48 तासांत दाखवायला काय हरकत होती? तसे झाले असते तर सत्तास्थापनेच्या अग्निपरीक्षेतून सर्वच दावेदारांना वेळ काढून जाता आले असते. तेवढे करूनही जर कोणाकडून त्यानंतर सत्ता स्थापन झाली नसती तर राज्यपालांच्या आजच्या कृतीस नैतिक बळ मिळाले असते.
Visit : Policenama.com