दीपक निकाळजेंचे तिकीट कापले, दबावानंतर उमेदवार बदलला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – छोटा राजनचा भाऊ आणि रिपब्लिकन पक्षाचा पदाधिकारी दीपक निकाळजे यांच्या उमेदवारीची घोषणा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केली होती. मात्र, भाजपाकडून दबाव आल्याने आता रिपाईने त्यांचे तिकीट कापले असून त्याऐवजी फलटणमधून स्थानिक नेते दिगंबर अगावणे यांना उमेदवारी दिली आहे. त्याची घोषणा रिपाईचे वरिष्ठ नेते व राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी जाहीर केली.

महायुतीत रिपाईच्या वाट्याला ६ जागा मिळाल्या. रिपाईला दीपक निकाळजे यांच्यासाठी चेंबुर मतदारसंघ हवा होता. पण तो न मिळाल्याने त्यांना फलटणमधून उमेदवारी देण्यात आली. तसेच रिपाईला माळशिरस, भंडारा, नायगाव, पाथरी आणि मानखुर्द शिवाजीनगर या जागा मिळाल्या आहेत.

फलटणमधून दीपक निकाळजे यांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. महायुतीत रिपाई याचा समावेश आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील भ्रष्ट नेत्यांना भाजपाने आपल्या पक्षात घेतल्याने त्यांची पापे धुतली का असा आरोप भाजपावर होत आहे. त्यात थेट गँगस्टरलाच उमेदवारी दिली गेल्याने त्याचा विरोधक गैरफायदा घेतील, अशी भिती भाजपाकडून व्यक्त होऊ लागली होती. त्यामुळे अनेकांनी रामदास आठवले यांना उमेदवारी बदलण्याची विनंती केली. शेवटी थेट मुख्यमंत्र्यांनीच यात लक्ष घातल्यावर आठवले यांनी दीपक निकाळजे यांची उमेदवारी मागे घेतली आहे.

दीपक निकाळजे यांनी मागील वेळी चेंबुरमधून निवडणूक लढविली होती. पण तेथे त्यांचा पराभव झाला होता.

visit : Policenama.com