मुंबई : विरारच्या Covid विजय वल्लभ हॉस्पिटलच्या ICU मध्ये लागली आग, 13 जणांचा मृत्यू

विरार : पोलीसनामा ऑनलाइन – विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आयसीयुला पहाटे लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यु झाला. त्यात ६ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुंबईतील भांडुपमधील कोव्हिड सेंटरला लागलेली आग, नागपूर आणि भंडारा या ठिकाणी रुग्णालयांना लागलेल्या आगीच्या घटना ताज्या असतानाच विरार पश्चिममधील विजय वल्लभ रुग्णालयाच्या आयसीयु ला पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.

विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण १७ रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दुसर्‍या मजल्यावरील आयसीयुला आग लागली. यावेळी तेथे रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांपैकी कोणीही नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाला पहाटे ३ वाजून १३ मिनिटांनी या आगीची खबर मिळाली. तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर भडकली होती. येथील केवळ ४ रुग्णांना कसेबसे बाहेर पडता आले. या आगीत संपूर्ण आयसीयु जळून खाक झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी एकच गर्दी केली आहे. नातेवाईकांच्या आक्रोशामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

अग्निशमन दलाने तातडीने आग विझविली असून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. या रुग्णालयातील रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्यासाठीचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे.
उमा सुरेश कनगुटकर (वय ६३), पुखराज वल्लभदास वैष्णव (वय ६८), रजनी आर कडु (वय ६०), नरेंद्र शंकर शिंदे (वय ५८), कुमार किशोर दोशी (वय ४५), जनार्धन मोरेश्वर म्हात्रे (वय ६३), रमेश टी उपायन (वय ५५), प्रवीण शिवलाल गौडा (वय ६५), अमेय राजेश राऊत (वय २३), शमा अरुण म्हात्रे (वय ४८), सुवर्णा एस पितळे (वय ५४), सुप्रिया देशमुख (वय ४३) अशी मृतांची नावे आहेत.