अखेर ठरलं ! शपथ ग्राहणाच्या तयारीत मग्न मुंबई पोलिस, पोहोचली वानखेडे स्टेडियम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री पदाचा पेच सुटला नसला तरी भाजपने शपथ ग्रहण समारंभाची तयारी सुरु केली आहे. मुंबई पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या एका पथकाने आज (शुक्रवार) वानखेडे स्टेडीयमची पाहणी केली. नव्या सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांचा शपथ ग्रहण सोहळा या ठिकाणी होणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी शपथ ग्रहण सोहळा होणार होता मात्र, मुंबई पोलिसांच्या अहवालानंतर शपथ ग्रहण सोहळ्याची जागा बदलण्यात आली आहे.

राज्यामध्ये मुख्यमंत्री कोणाचा यावरून भाजप-शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेला शिवसेना 50-50 फॉर्म्युल्यावर आडून बसला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री पदाची वाटणी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपने गृह आणि अर्थ या दोन महत्त्वाच्या खात्यांसह इतर महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी बोलताना म्हणाले की, सरकार स्थापनेबाबत लागत असलेला वेळ हे योग्य नाही. यावेळी त्यांनी सरकार स्थापनेबाबत अद्याप भाजपसोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Visit : policenama.com