‘महाविकास’चं सरकार 5 वर्ष चालेल, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपच्या ‘या’ नेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता स्थापनेच्या रस्सीखेचानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात महाविकासआघाडीच्या सरकारला सुरुवात झाली. यानंतर भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे सरकार पाच वर्ष चालेले असे देखील तारासिंग यावेळी म्हणाले.

तारासिंग यांचा मुलगा सध्या पीएनबी घोटाळ्यात आरोपी आहे. मात्र शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपचे आमदार राहिलेल्या तारासिंग यांना भाजपने यावेळी विधानसभेचे तिकीट नाकारले होते. तारासिंग हे मुलुंड विधानसभा क्षेत्रातून आमदार राहिलेले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देताच पक्षात नाराज असलेल्या लोकांकडून त्यांच्याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती. एकनाथ खडसेंनी तर फडणवीस यांच्यासह केंद्रीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत भाजपला घरचा आहेर दिला होता. तिकीट कापण्याबाबत सर्वांना विचारले तर याबाबत कोणीच उत्तर दिले नाही तसेच आम्हाला केवळ निवडणुकीत जरी सक्रिय ठेवले असते तरी भाजपच्या वीस – पंचवीस जागा वाढल्या असत्या असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले होते.

सिंचन घोटाळ्याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, आम्ही ते गाडीभर पुरावे केव्हाच रद्दीत विकले आहे. अजित पवार यांनी भाजपशी केलेल्या हातमिळवणीवर आणि फडणवीस यांनी याला दिलेल्या साथीवर एकनाथ खडसे यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. भाजपमधून आपल्याला डावलल्याने नाराज असलेल्या खडसेंनी आपल्या मनातील खदखद यावेळी व्यक्त केली होती.

Visit : Policenama.com