‘मी पुन्हा येईन’वरून जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना ‘टोला’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीपूर्वी ‘मी पुन्हा येईन’ असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र त्यांना विरोधी पक्षात बसावे लागले आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी त्यांना कोपरखळी मारली आहे. मी परत येईन म्हटलं, पण कुठं बसेन ते सांगितलं नाही, फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड योग्य आहे असे जयंत पाटील म्हणाले. विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी फडणवीसांचे अभिनंदन करताना ते बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले की , ‘ देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत. गेली 5 वर्ष फडणवीसांनी चांगले काम केले. एखादा विषय समजावून घेऊन प्रश्न सोडविले. प्रसिद्धीप्रमुख म्हणूनही देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी काम केलं होतं. त्याचा फायदा त्यांना मुख्यमंत्री म्हणून सरकार चालविताना झाला. पुढील 5 वर्ष तुम्ही त्याठिकाणीच बसावं, या बाकांवर येण्याचा प्रयत्न करु नये. 2024 मध्ये लोकशाही मार्गाने प्रयत्न करायला हवेत, तुमचे संबंध सगळ्यांशी जवळचे आहे. प्रत्येकाला दिलेल्या खुर्च्या फिक्स आहेत. खुर्च्या बदलण्याचे प्रयत्न कोणी केले तर आपल्याकडून त्याला प्रतिसाद मिळणार नाही असं काम करा. विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीचा मान वाढविण्याचा प्रयत्न तुमच्याकडून व्हावा. महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचे काम कराल अशी शुभेच्छा देतो. ‘

महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाने एकमताने पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली. आज विधानसभेच्या सत्रात अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या नियुक्तीची घोषणा केली. फडणवीस यांच्या नियुक्तीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.

Visit : Policenama.com