महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार ‘कडक’ कायदा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांविरोधातले खटले वेगाने निकाली निघावेत आणि आरोपीला कठोर शासन होऊन अशा प्रकारांवर जरब बसावी, यासाठी कठोर कायदा करण्याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (शुक्रवार) दिले. एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात यासंदर्भात विधि व न्याय विभाग आणि गृह विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

महिला व बालकांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत असून अशा प्रकरणांमधील आरोपींना वेळेत आणि कठोर शिक्षा झाल्यास अशा प्रकारांना आळा बसेल, असा मतप्रवाह आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही अनेक आमदारांनी महिला अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकरणांमधील तपासात कशा प्रकारे सुधारणा करता येईल, कमीत कमी वेळेत खटले कसे निकाली काढता येतील, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत चर्चा झाली.

महाराष्ट्रातील अस्तित्वातील कायद्यांचा अभ्यास करून त्यात अधिक सुधारणा करण्याच्या दिशेने, आरोपीला कमीत कमी वेळेत शिक्षा व्हावी, यादृष्टीने कायद्यात काय सुधारणा करता येतील आणि कठोर कायदा कसा करता येईल, याबाबतचे प्रारुप तयार करण्याचे निर्देश गृहमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. गुन्हेगारांवर वचक बसवायचा असेल तर अधिक कठोरपणे कायद्याची अंमलबजावणी आवश्यक असून राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी कठोर कायदा आवश्यक असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/