राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ‘सेल्फ क्वारंटाइन’ मध्ये

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशात कोरोना ग्रस्तांचा आकडा वाढत आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. लॉकडाऊनचा काळ देखील ३० एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे. वारंवार नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री ,राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला ‘होम क्वारंटाइन’ केल्याची माहिती मिळते आहे. ‘कोविड १९’ पॉझिटिव्ह आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळं त्यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे. याबाबतचे वृत्त ‘टाइम्स नाउ’ ने दिले आहे.

आव्हाड यांच्यासोबत काही पत्रकारही सेल्फ क्वारंटाइन मध्ये

याबाबत मिळालेली मिळालेली अधिक माहिती अशी की , मुंब्रा येथील एक पोलीस कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. आव्हाड हे त्याच्या संपर्कात आलेले असल्यानं त्यांनी ‘होम क्वारंटाइन’चा निर्णय घेतला आहे. याच पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात काही पत्रकारही होते. त्यांनाही सेल्फ क्वारंटाइनचा सल्ला प्रशासनानं दिला आहे.

प्रशासन सतर्क

करोनाच्या संकट काळात लोकांना दिलासा देण्यासाठी व लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी आघाडीवर राहून काम करत आहेत. त्या-त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींचा व पत्रकारांचा त्यांच्याशी सतत संपर्क येत आहे. आघाडीवर राहून काम करणारा मुंब्रा येथील एक पोलीस कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. मागील काही दिवसांत जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक लोक आले होते. स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळं प्रशासनानं खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.