मोदींच्या मंत्रिमंडळातील बड्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या संस्थेनं चीनकडून घेतली देणगी : जितेंद्र आव्हाड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू आहे. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारच्या पत्राचाही उल्लेख केला होता, ज्यात चिनी वस्तूंचा वापर न करण्याचा संकल्प घेण्याचा उल्लेख होता. दरम्यान, आतापर्यंत चीनच्या मुद्यावर कॉंग्रेसला राजकारण करू नका असा सल्ला देणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोर्चेबांधणी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्रातील उद्धव सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका करत म्हंटले की, ‘आता स्वयंघोषित देशभक्त चिनी वस्तूंच्या बहिष्काराबद्दल बोलत आहेत. त्यांनी आरोप केला की, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या मुलाच्या संस्थेने चीनकडून तीन कोटी रुपयांची देणगी घेतली.

उद्धव सरकारच्या मंत्र्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांनाही धारेवर धरले. आव्हाड यांनी आरोप केला की, डोभालशी संबंधित संस्थाही चिनी संघटनांशी संबंधित आहे आणि ते आता चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याविषयी बोलत आहेत. दरम्यान, चीनकडून लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावावर विरोधी कॉंग्रेस पक्ष सरकारवर हल्लाबोल करत आहे. तर भाजपनेही कॉंग्रेसविरोधात मोर्चा उघडला आहे. भाजपने काँग्रेसवर पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून राजीव गांधी फाउंडेशनमध्ये निधी हस्तांतरित केल्याचा आरोप केला होता. भाजपने कॉंग्रेसवर चीनकडून देणगी घेतल्याचाही आरोप केला.

आता जितेंद्र अहवाड यांनी चीनकडून देणगी घेण्याच्या संदर्भात सत्ताधारी भाजपला घेराव घातला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच म्हटले होते की, तणावामुळे चीनबरोबर राजकारण करणे योग्य नाही. शरद पवार यांनी थेट कोणाचेही नाव न घेता आपला मित्रपक्ष काँग्रेसला संदेश दिला कि, आपण 1962 विसरू नये. दरम्यान, लडाखच्या गालवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक चकमकीत 20 सैनिक ठार झाले. या घटनेपासून कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सरकारवर सतत निशाणा साधत आहे.