महाराष्ट्रातील ‘सॅनिटायझर-हॅन्डवॉश’ बनविणार्‍या कारखान्यात स्फोट, दोघांचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाइन – पालघरमध्ये सॅनिटायझर आणि हँडवॉश तयार करणाऱ्या कारखान्यात सोमवारी रात्री ११.३० वाजता स्फोट झाला असून या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी आहे. स्फोट झाला त्या दरम्यान कंपनीत ६६ कर्मचारी काम करत होते. सध्या घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पालघरमधील तारापूर येथे असलेल्या केमिकल फॅक्टरीत सोमवारी स्फोट झाला. हा कारखाना सॅनिटायझर आणि हँडवॉशसाठी कच्चा माल बनवत होता. कारखान्याने कच्चा माल तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती. कंपनीचे नाव गॅलेक्सी सर्फेक्टंट्स असून रात्री ११.३० वाजता अचानक स्फोट झाला आणि आग लागली.

दरम्यान अग्निशमन घटनास्थळी दाखल झाले आणि थोड्या वेळाने आगीवर नियंत्रण मिळवले. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जेव्हा अपघात झाला त्यावेळी फॅक्टरीत ६६ लोक काम करत होते.

सध्या स्फोटाचे कारण स्पष्ट झाले नसून अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. संपूर्ण देशात कोरोनाचा प्रसार होत असल्यामुळे सर्वत्र सॅनिटायझर-हँडवॉशची मागणी वाढली आहे, परंतु महाराष्ट्रातील कोरोनाचे स्वरूप अधिकच धोकादायक होत आहे. आतापर्यंत येथे २ हजाराहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि १५० लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून सर्व पावले उचलली जात असून लॉकडाउन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन आहे. तसेच, लोकांना सॅनिटायझर आणि हँडवॉश वापरण्याचेही आवाहन केले जात असल्यामुळेच सॅनिटायझरची मागणी वाढली असल्याने महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात सॅनिटायझर तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे.