पोलिसांच्या ट्विटवर आयुषमान खुरानानं दिलं मराठीत उत्तर

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनमध्ये अनावश्यक कारणांसाठी बाहेर न फिरण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मात्र तरीदेखील काही जण नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत आहेत. अलिकडेच महाराष्ट्र पोलिसांनी ‘गुलाबो सिताबो’ या आगामी चित्रपटाच्या टॅगलाइनचा अनोख्या पद्धतीने वापर करत नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे त्यांचे हे ट्विट पाहिल्यानंतर अभिनेता आयुषमान खुरानानेदेखील मराठीमध्ये ट्विट करत नागरिकांना घरी राहण्यास सांगितले आहे.

अभिनेता आयुषमान खुराना आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘गुलाबो सिताबो’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनीदेखील नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यासाठी या चित्रपटाचा आधार घेतलाआहे. घर तुमचे, जमीन तुमची, मर्जी तुमची, पण बाहेर जाण्याची परमिसन आमची घ्यावी लागेल. तुमच्याच सुरक्षेसाठी. कोरोनाव्हायरस पासून सर्वात सुरक्षित ठिकाण आहे तुमची स्वतःची हवेली. विनाकारण बाहेर जाऊ नका, सुरक्षित राहा. असे ट्विट महाराष्ट्र पोलिसांनी केले होते. त्यानंतर आयुषमाननेदेखील लगेच ते रिट्विट करत अगदी बरोबर. घरात सुरक्षित,बाहेर सध्या नाही, असे ट्विट केले आहे.