राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यानं बदलली भूमिका, झाली अजित पवारांची राजकीय ‘गेम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात रात्रभर फडणवीस सरकार स्थापनेत जर एखाद्या व्यक्तीने सर्वात महत्वाची भूमिका बजावली असेल तर ते राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे होय. अजित पवारांसाठी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनीच प्रयत्न केले होते. जेव्हा राजभवनात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा धनंजय मुंडे यांनीच अजितदादासाठी आमदारांना एकत्र केले. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सायंकाळपर्यंत बहुमताच्या चाचणीचा आदेश दिला. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अजित पवार यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेत राजीनामा जाहीर केला.

आता असे समजले जात आहे की भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या छावणीत सामील झाले आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा भूकंप झाला आणि फडणवीस सरकार पडले.

राजकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे यांनीच शपथ घेण्यापूर्वी आमदारांना एकत्र केले आणि त्यांना त्यांच्या घरी बोलावले. येथून सर्व आमदार राज्यपालांच्या घरी पोहोचले. विशेष माहिती म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर कन्या पंकजा मुंडे यांना वडिलांचा राजकीय वारसा मिळाला. पुढे जाऊन धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत आणण्यात आणि पंकजा मुंडेंविरोधात निवडणूक जिंकण्यात अजितदादांची मोठी भूमिका होती.

असे म्हटले जात आहे की भाजप आणि अजितदादांना एकत्र आणण्यात धनंजय मुंडे यांची सर्वात महत्वाची भूमिका होती. शुक्रवारी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सरकार स्थापनेची योजना तयार केली आणि अजितदादांना पाठिंबा दर्शविला. यानंतर, धनंजय मुंडे पुन्हा शरद पवारांकडे परतल्यावर राजकीय गणितं बदलली आणि महाराष्ट्रातून भाजपाची सत्ता गेली.

अधिक माहिती अशी की, दोन दिवसांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय देताना बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत फ्लोअर टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला. दिल्लीतही मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यानंतर फडणवीस यांनीही आपला राजीनामा जाहीर केला.

Visit : Policenama.com