Coronavirus : राज्यात 24 तासात ‘कोरोना’चे 2190 नवे रुग्ण तर 105 जणांचा मृत्यू, बाधितांची संख्या 57000 च्या टप्प्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल राज्यात 24 तासात 97 जणांचा बळी गेलेला असतानाच आज राज्यात 24 तासात 105 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 2190 नवे रुग्ण सापडल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्याही 56948 वर पोहचली आहे. राज्यात दररोज सरासरी दोन हजार नवे रुग्ण सापडत असून 80 ते 90 जणांचा मृत्यू होत असल्याने कोरोनाचं संकट वाढत चालल्याचे पहायला मिळत आहे.

राज्यात आज दिवसभरात 964 कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्य़ंत राज्यात 17918 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 82 हजार 701 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 37 हजार 761 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या 2 हजार 684 कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण 17 हजार 119 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून 68.03 लाख लोकांचे सर्वेक्षण केले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज 105 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक 32, ठाणे 16, जळगाव 10, पुणे 9, नवी मुंबई 7, रायगड 7, अकोला 6, औरंगाबाद 4, नाशिक 3, सोलापूर 3, सातारा 2 नगर, नागपूर, नंदूरबार, पनवेल, वसई-विरारमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गुजरातमधील एका व्यक्तीचा ही मुंबईत मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 72 पुरुष आणि 33 महिलांचा समावेश आहे.