मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ‘महाविकास’ आघाडीची बाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये बाजी मारल्यानंतर आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पुन्हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. पुणे महसूल विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून कोकण महसूल विभागातून शेकापचे राजेंद्र पाटील विजयी ठरले आहेत. तर बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटमधून माजी संचालक अशोक वाळुंज निवडून आले आहेत. त्यांनी राजेंद्र शेळके यांचा पराभव केला.

दुसरीकडे भाजी मार्केटमधून शंकर पिंगळे यांनी बाजी मारली असून त्यांनी के. डी. मोरे यांचा पराभव केला. मसाला मार्केटमधून किर्ती राणा पराभूत झाले असून विजय भुत्ता हे तेथून विजयी झाले आहेत. धान्य मार्केटमधून निलेश विरा विजयी झाले आहेत. दरम्यान, कामगार मतदार संघातून शशिकांत शिंदे व फळ मार्केट मधून संजय पानसरे याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे बाळासाहेब सोईस्कर आणि काँग्रेसचे धनंजय वाडकर यांनी बाजी मारली आहे.

दरम्यान,राज्यातील ३०५ बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ३४ जिल्ह्यांमध्ये मतदान झालं. या निवडणुकीसाठी शनिवारी ९२.५७ टक्के मतदान झालं. यावेळी एकूण ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. सहा महसूल विभागांमधून १२ शेतकरी प्रतिनिधी व चार व्यापारी प्रतिनिधींची निवड करण्यासाठी हे मतदान घेण्यात आलं. या निवडणुकीमध्येही महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवत शेकापनं पॅनल तयार केलं होतं. तर भाजप नेत्यांनीही काही उमेदवारांना ताकद दिली होती. सहा महसूल विभाग व व्यापारी मतदारसंघांमध्ये एकूण १७ हजार ५१३ मतदार होते. अमरावतीमध्ये ९९, कोकणामध्ये ९९.६४, पुण्यामध्ये ९९ टक्के मतदान झालं होतं. याचबरोबर महसूल विभागांमध्ये तब्बल ९८.७२ टक्के मतदान झालं होतं, तर व्यापारी मतदारसंघामध्ये ८७.२१ टक्के मतदान झालं.