महाशिवरात्री निमित्ताने वाघेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन (कल्याण साबळे पाटील) – महाशिवरात्रीनिमित्त वाघोली येथील वाघेश्वर मंदिरात हजारो भाविकांनी शुक्रवारी दर्शनासाठी गर्दी केली. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

पुणे शहरालगत असणाऱ्या प्राचीन अशा वाघेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. तर गेले आठ दिवसापासून येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन देखील केले आहे. पहाटेपासूनच येथे भक्तांनी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर गेले काही वर्षापासून विजय गायकवाड हे येणाऱ्या भाविकांना प्रसादाचे वाटप करत आहे. यावर्षीदेखील त्यांनी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते येणाऱ्या भाविक भक्तांसाठी लाडू वाटप करुन दिवसभारात एक लाख लाडूचे वाटप करण्यात येत आहे. केळी तसेच जय गणेश ग्रुप च्या वतीने लस्सी चे आणि पाण्याचे वाटप करण्यात आले. यासाठी सार्वजनिक मंडळे आणि उद्योजकांनी सहकार्य केले होते.

मंदिरात गुरुवारी रात्री १२ नंतरच दर्शन व अभिषेकासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पहाटेनंतर गर्दीत भर पडून सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. तसेच मुख्य मंदिरासमोरील छोट्या मंदिरात दिवसभर अभिषेकासाठी रांग होती. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांना बंदी घालण्यात आली होती.

त्यामुळे भाविकांचे दर्शन सुलभ झाले. पुणे- नगर महामार्गालगतच पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाघेश्वर विकास प्रतिष्ठान, वाघोली ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने मंदिरात नियोजन करण्यात आले होते.

यावेळी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, वाघोलीचे सरपंच वसुधंरा उबाळे, रामभाऊ दाभाडे, शिवदास उबाळे, वाघेश्वर उद्योग समुहाचे विजय गायकवाड, संदिप (आबा) सातव, सपंत गाडे, मंगेश सातव, सुधीर भाडळे, राजेंद्र काळे, गणेश सातव, चाचा जाधवराव, संदिप जाधव, दत्ता जगताप, संतोष हरगुडे, दादासाहेब गोरे, सचिन उबाळे, मनोज सातव, पढंरीनाथ सातव, गणेश तांबे व ग्रामस्थ आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.