शिवसेनेच्या मेळाव्यावरुन परतताना भीषण अपघात ; एकाच गावातील ७ जण जागीच ठार

गडहिंग्लज : महागाव रस्त्यावर एसटी आणि कारचा भीषण अपघात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील महागावजवळ आज दुसरा भीषण अपघात घडला. एसटी बस आणि टाटा सुमो यांच्या अपघातात एकाच गावातील ७ जण जागीच ठार झाले आहेत. तर सुमारे २० जण जखमी झाले आहेत. टाटा सुमोमधील सातही जण नुल या गावचे असून ते शिवसेनेचा मेळावा आटोपून परतत असताना हा भीषण अपघात झाला. तर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या एका अपघातात माय लेकाचा मृत्यू झाला. गडहिंग्लज तालुक्यातील हा दुसरा भीषण अपघात आहे.

टाटा सुमो जीपमधील सर्वजण नुल या गावचे रहिवासी आहेत. ते चंदगड येथून शिवसेनेचा मेळावा आटोपून नुल या गावी परतत होते. त्यावेळी पावसाची रिपरिप सुरु होती. दरम्यान महागाव येथील अनिकेत हॉटेलजवळ आल्यावर एसटी चालकाचा ताबा सुटला आणि ती समोरुन येणाऱ्या टाटा सुमोला धडकली. या धडकेत एसटीने सुमो गाडीला जोरात फरफटत नेले. दरम्यान अपघातात ७ जण जागीच ठार झाले. तर एसटीतील १५ ते २० जण जखमी झाले आहेत. सुमो व एसटी झाडांच्या जवळ अडकल्याने मयत व जखमींना काढताना अडचणी आल्या.

मात्र भररस्त्यात अपघात झाल्याने बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. तर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.