मालेगाव बॉम्बस्फोट : पुरोहित, साध्वी प्रज्ञासह ७ जणांवर आरोप निश्चित 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मालेगावमधील २००८ सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने आज मंगळवारी आरोपनिश्चिती केली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह सात आरोपी आहेत. दहशतवादाचा कट रचणे, हत्या अशा विविध कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित याच्यासह अन्य आरोपीविरोधात मंगळवारी एनआयएकडून आरोप निश्चित करण्यात आले. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल पुरोहित प्रसाद, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय रहीरकर, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चर्तुवेदी यांच्यासह सर्व ७ जणांवर दहशतवादी कृत्य करणे, हत्या आणि अन्य गुन्ह्यांखाली आरोप निश्चित केले आहेत. तर लेफ्टनंट कर्नल पुरोहित प्रसाद याची आरोप निश्चितीस स्थगिती देणारी याचिका फेटाळून लावली. दरम्यान, हायकोर्टाने एनआयएचे वकील संदेश पाटील यांना पुढील सुनावणीपर्यंत कर्नल पुरोहित यांनी दिलेल्या एका अर्जाचे उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे प्रकरण –

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथील मुस्लिम बहुल परिसरात बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. त्यात सहाजणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हिंदू दहशतवाद्यांचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांना बॉम्बस्फोटाचा कट रचणे आणि त्याची अंमलबजावणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. १० वर्षे उलटल्यानंतर आता सर्व आरोपींविरोधात आरोपनिश्चिती करण्यात आली आहे.