एकतर्फी प्रेमाला अडसर असल्याच्या समजातून तरुणीच्या मामेभावाचा खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तिच्या मामेभावाचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपुरमध्ये घडली आहे. राहुल तुर्केल (वय-२८) असे खून झालेल्या मामेभावाचे नाव आहे. राहुल आपल्या प्रेमात अडसर ठरत असल्याचा गैरसमज आरोपी रिचेश सिकलवार याला झाला होता. याच गैरसमजूतीतून त्याने राहूलचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी रिचेशला अटक केली आहे

नागपूरमधील गाडगेनगर परिसरात राहणाऱ्या राहुलचा मृतदेह रविवारी (दि.२४) आढळला होता. काल आरोपी रिचेशचा वाढदिवस होता. त्याने मित्रांसाठी त्याच्या घरी पार्टी ठेवली होती. सकाळी रिचेश आणि त्याच्या काही मित्रांसह पार्टी करण्यासाठी निघाले होते. या पार्टीला राहुलला देखील बोलावण्यात आले होते. राहुलने रिचेशच्या वाढदिवसाच्या पार्टीला जात असल्याचे घरच्यांना सांगून बाहर पडला. मात्र, संध्याकाळी राहुलचा मृतदेह रिचेशच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.

आरोपी रिचेश सिकलवारचं राहुलच्या मामे बहिणीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र रिचेशची वागणूक पाहून राहुलची बहीण आणि तिचं कुटुंबीय रिचेशला पसंत करत नव्हते. वर्षभरापूर्वी तरुणीच्या कुटुंबीयांनी म्हणजेच राहुलच्या मामाने तिचं लग्न जमवलं होतं. यामुळे आपला मित्र राहुलनेच प्रेमसंबंधांत अडसर आणल्याचा रिचेशचा समज झाला होता. विशेष म्हणजे तरुणीच्या लग्नानंतरही रिचेश तिचा पिच्छा सोडत नव्हता. रिचेशने त्या तरुणीच्या सासरी चुकीची माहिती पसरवल्यामुळे सासरच्या मंडळींनी तिला माहेरी पाठवून दिलं. तरुणी माहेरी परतल्यामुळे तिच्याशी लग्न करण्याची इच्छा पुन्हा रिचेशच्या मनात निर्माण झाली.

रिचेश रविवारी सकाळी पूर्ण नियोजन करुन राहुलच्या घरी पोहचला. माझा आज वाढदिवस आहे, आपण पार्टी करु, असं सांगून तो राहुलला घेऊन गेला. त्याला मनसोक्त दारु पाजली आणि आपल्या घरात त्याचा खून करुन मृतदेह घरात तसेच ठेवून बाहेरुन कुलूप लावून तो फरार झाला. संध्याकाळी शेजाऱ्यांनी रिचेशच्या घरी रक्ताने माखलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह दिसल्याची माहिती पोलिसांना दिली आणि सर्व प्रकरण समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणी रिचेश सिकलवारला अटक केली आहे. तर त्याला या हत्या प्रकरणात आणखी कोणी मदत केली आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.