धक्कादायक ! दाल फ्राय वाढल्याने पतीची सटकली ; पत्नीवर फेकले अ‍ॅसिड 

आगरा : वृत्तसंस्था – जेवणात दाल फ्राय वाढल्याने चिडलेल्या पतीने पत्नीवर अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. त्यात ती ५० टक्के भाजली. या घटनेनंतर पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांजिण्या झालेल्या पतीला तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाण्यास डॉक्टरांनी मनाई केली होती.  मात्र असे असतानाही पत्नीने त्याला दाल फ्राय जेवणात वाढलं. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि  तिने त्याला मुलांना घेऊन माहेरी जाण्याची धमकीही दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने तिला बेदम मारहाण करत रागारागातच तिच्यावर  दागिने साफ करण्याचे अ‍ॅसिड फेकलं.

आगरा येथील जगदीशपुरा परिसरातील नगल गुलर परिसरात ही घटना घडली. याविषयी पत्नीने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पतीविरोधात कलम ३२६ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे. मात्र पतीने याचा इन्कार केला असून आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचं पोलिसांना सांगितलं आहे.